डोंबिवलीतील 27 गावांना मिळणार मुबलक पाणी

डोंबिवलीतील 27 गावांना मिळणार मुबलक पाणी

ठाणेः कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात येणाऱ्या 27 गावांना कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत 27 गावांना उच्च दाबाने आणि मुबलक पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. एमआयडीसीकडून शहराला 105 दशलक्ष लीटर पाणी देणे अपेक्षित असताना फक्त 60 दशलक्ष लीटर पाणी मिळत असल्याची बाब यावेळी उद्योग मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कल्याण डोंबिवलीला 90 दशलक्ष लीटर पाणी देणारच असे स्पष्ट केले. यावेळी शहरातील इतर पाणी समस्यांवरही दिलासादायक निर्णय घेण्यात आले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कायम सक्रीय असतात. त्यांच्या माध्यमातून शहरातील पाणी पुरवठा योजना मार्गी लागते आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक महिन्यांपासून केल्या जात होत्या. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सातत्याने केली जात होती. यासह शहरातील पाण्याच्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने आज (शुक्रवारी ) मंत्रालयात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी शहरातील पाण्याच्या समस्या मांडल्या.

कल्याण डोंबिवली पालिकेसाठी 105 दशलक्ष लीटर पाणी मंजूर आहे. मात्र अवघा 60 दशलक्ष लीटर पाणी प्रत्यक्षात मिळते. त्यामुळे किमान 90 दशलक्ष लीटर पाणी मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यावर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ निर्णय देत या किमान 90 दशलक्ष लीटर पाणी तेही उच्च दाबाने देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच एमआयडीसीकडून किती पाणी पुरवण्यात येते, त्याचा दाब किती असतो, याची माहिती मिळण्यासाठी येथे मीटर बसवण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले. अमृत योजनेत पाणी पुरवठा करण्यासाठी हेदुटने आणि कोळे येथे दोन नव्या जोडण्या देण्याची मागणी होती. त्यावर तात्काळ निर्णय उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी देत या जोडण्यांना परवानदी देण्याचे आदेश दिले.

एमआयडीसी प्रशासनाकडून उद्योगांना पाणी देण्यात येते. मात्र रहिवाशांना पिण्याचे पाणी देण्यास प्राथमिकता द्यायला हवी, असे सांगत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्योगांना सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सेकंडरी प्रक्रिया केले जाणारे पाणी देण्याचा प्रस्ताव ठेवला. कल्याण पूर्वेतील पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून हे पाणी देण्यासाठी आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी त्याचा सविस्तर अभ्यास आणि अहवाल तयार करण्याचे आदेश यावेळी उदय सामंत यांनी दिले. त्यामुळे रहिवाशांना पाणी देणे सोपे होणार आहे. तसेच एमआयडीसीने प्रक्रिया केलेले किमान 40 दशलक्ष लीटर पाणी रहिवाशांना देता येईल. शहराजवळ सातत्याने प्रदूषणाच्या समस्या समोर येत असतात. अशा तक्रारींवर तात्काळ तपासणी होण्यासाठी एमआयडीसीच्या कार्यालयातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जागा द्यावी, असे आवाहन यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.


हे ही वाचा – शिंदे गटाच्या युवासेनेच्या कार्यकारिणीतील सदस्यांची नावे जाहीर

First Published on: September 30, 2022 6:50 PM
Exit mobile version