महेश आहेर मारहाण प्रकरण; जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

महेश आहेर मारहाण प्रकरण; जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

संग्रहित छायाचित्र

 

ठाणे : महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रसचे आमदार जितेंद् आव्हाड यांना स्थानिक न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आव्हाड यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिन्यात आहेर यांना आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहण केली होती. आहेर यांनी पोलिसांत याची तक्रार केली. आव्हाड यांचा कट रचून मला जीवे ठार मारण्याचा हेतू होता, असा आरोप आहेर यांनी तक्रारीत केला होता. त्यामुळे आव्हाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आव्हाड यांनी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने आव्हाड यांचा अर्ज मंजूर करत अटकेपासून संरक्षण दिले.

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकीची एक कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याचे या संभाषणात एका व्यक्तीने म्हटले आहे. या क्लिपमध्ये बोलणाऱ्या व्यक्तिचे नाव महेश आहे. ती व्यक्ती ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर असल्याचा दावा केला जात होता. याच दाव्यावरून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर यांना त्यांच्या अंगरक्षकसोबत असताना महापालिका मुख्यालयाच्या मागील गेट चारच्या बाहेर बेदम मारहाण केली. या मारहाणीत महेश आहेर यांच्या डोळ्याला दुखापत झाली. आहेर यांना पोलीस संरक्षण आहे. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा त्यांचे अंगरक्षक त्यांच्यासोबत होते. महेश आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर आहेर यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले.

आहेर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि अन्य तिघे अशा सातजणांविरुद्ध भादंवि कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (बी) यासह शस्त्रास्त्रे कायद्याच्या 3/25, 4/25 अन्वये एफआयआर (क्रमांक 60/2023) नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात आव्हाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.

First Published on: March 3, 2023 9:35 PM
Exit mobile version