Kalyan Constituency : भाजपा आमदाराची पत्नी ठाकरे उमेदवाराच्या प्रचारात?

Kalyan Constituency : भाजपा आमदाराची पत्नी ठाकरे उमेदवाराच्या प्रचारात?

ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव कल्याण-डोंबिवली मतदारसंघासाठी जाहीर केलं आहे. यानंतर कल्याण पूर्वेतील भाजपा आणि आमदार गणपत गायकवाड समर्थकांनी देखील आम्ही महायुतीचे काम करणार असल्याचे जाहीर केले होते, असे असले तरी गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या वारंवार महाविकास आघाडीबरोबर दिसत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Lok Sabha Election 2024 Kalyan Constituency BJP MLAs wife campaigning for Thackeray candidate )

अंबरनाथ तालुक्यातील मंगरूळ येथील घोरप गावात गावदेवी मंदिराचे जीर्णोद्धर आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबत भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड ओपन जीपमधून प्रवास करताना दिसल्या. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचे संपर्क प्रमुख धनंजय बोडरे, अंबरनाथ विधानसभा प्रमुख राजेश वानखेडे तसेच समस्त गावकरी उपस्थित होते.

हेही वाचा – Lok Sabha : अनेक वर्ष तुम्ही घड्याळाचं बटण दाबलं…; अजित पवारांची बारामतीकरांना साद

माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, गावदेवी मंदिराच्या जीर्णोद्धर आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सहभागी झालो होतो. हा कार्यक्रम धार्मिक होता, राजकीय नाही, त्यामुळे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीला देखील आमंत्रण केलं होतं. यावेळी त्यांना सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आमदार गणपत गायकवाड हे तुरुंगात आहेत, ते भाजपाचे आमदार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र आहेत. ते आमच्या पक्षाचे आमदार नाहीत. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना विचारा, असे बोलून संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देत श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये झालेल्या करोडो रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशी मागणी केली आहे, असे म्हटले.

गणपत गायकवाड यांचा मविआला छुपा पाठिंबा (Ganpat Gaikwad’s secret support to Maviya)

कल्याण-डोंबिवली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र भाजपा कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात नाराजी आहे. तसेच गोळीबारप्रकरणानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सुरूवातीला बंडाची भूमिका घेतली होती, परंतु नंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगून त्यांनी महायुतीचा प्रचार करू, असे जाहीर केले. असे असतानाही ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचाराला आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीने उपस्थिती लावल्याने महाविकास आघाडीला त्यांचा छुपा पाठिंबा दिला असल्याची चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे. कारण याआधीही सुलभा गायकवाड यांनी पाडव्याला वैशाली दरेकर यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती.

हेही वाचा – Lok Sabha : बारामती मतदारसंघात नवा ट्विस्ट; रोहित पवारांच्या मातोश्रींनी घेतला उमेदवारी अर्ज

Edited By – Rohit Patil

First Published on: April 16, 2024 8:28 PM
Exit mobile version