आर.टी.ई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

आर.टी.ई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

आरटीई प्रवेशाला ३ मार्चपासून सुरुवात

महापालिका कार्यक्षेत्रातील कायम विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्य संचलित शाळांमध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE) 2009 अन्वये 25 टक्के राखीव असलेल्या जागांसाठी शैक्षणिक वर्षे 2021-22 साठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेशप्रक्रिया राज्यस्तरावरुन ऑनलाईन पध्दतीने होणार असून पालकांनी पाल्यांचे अर्ज ऑनलाईन सादर करावयाचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 03/03/2021 ते 21/03/2021 असून हे अर्ज www.student.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती शिक्षणविभागाने दिली आहे. शासनाच्या धोरणानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये आर.टी.ई अंतर्गत शाळेच्या प्रवेशस्तरावरील वर्गातील प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

सन 2021-22 साठी ही प्रवेश प्रक्रिया 3 मार्च 2021 पासून सुरू होणार असून इच्छुक पालकांनी आर.टी.ई पोर्टलवरुन आपल्या पाल्यांचे अर्ज सादर करावयाचे आहे. हे अर्ज सादर करताना या सोबत सक्षम निवासी पुरावा, वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी वडिलांचे जात प्रमाणपत्र, आर्थ‍िक दुर्बल्‍ गटातील / एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी 1 लाखांच्या आतील उत्पन्न असल्यास उत्पन्नाचा दाखला, जन्मदाखला तसेच दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 40 टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे जिल्हाशल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व जातीचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरला जाणार नाही असे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी नमूद केले.

नर्सरी, ज्यु.के.जी व इयत्ता पहिली या वर्गांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार असून संपूर्ण प्रवेशप्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने होणार असून चुकीची माहिती भरुन प्रवेश घेतल्याचे आढळून आल्यास हे प्रवेश रद्द करण्यात येतील. लॉटरी पद्धतीने शाळेत पाल्याची निवड झाल्यानंतर अर्ज भरताना जे कागदपत्र सादर केले असतील त्याच्या पडताळणीसाठी आणि प्रवेश निश्च‍ितीसाठी अलॉटमेंट लेटरवर दिलेल्या पडताळणी केंद्रावर पालकांना जाणे अनिवार्य असेल. तरी जास्तीत जास्त पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.

First Published on: March 1, 2021 9:59 PM
Exit mobile version