सुपारी देणाऱ्यालाच घातल्या गोळ्या; नाशिकमधून दोघांना अटक!

सुपारी देणाऱ्यालाच घातल्या गोळ्या; नाशिकमधून दोघांना अटक!

प्रातिनिधिक फोटो

‘माझ्या हत्येची सुपारी दिली होती, म्हणून त्याचाच गेम करायचा ठरवले होते म्हणून ठोकले त्याला साहेब! नशिब चांगलं म्हणून वाचला अशी कबुली मटका किंग तसेच बांधकाम व्यवसायिक असलेल्या संदीप गायकवाड याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांनी पोलिसांना दिली. या हल्लेखोरांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिक येथून अटक केली आहे. हितेश गुलबीर ठाकूर (२३) आणि सागर किरण शिंदे (२३) असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. उल्हासनगर येथे राहणारे हे दोघे गुन्हेगारी वृत्तीचे असून दोघांवर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उल्हासनगर येथील ओमी कलानी गटाचा कार्यकर्ता तसेच मटका किंग आणि बांधकाम व्यवसायिक असणाऱ्या संदीप गायकवाड याच्यावर बुधवारी रात्री श्रीराम चौक या ठिकाणी गोळीबार करून लोखंडी रॉडने त्याला मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्यात संदीप गायकवाड हा जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले होते.

घटनास्थळी आलेल्या पोलिसांमुळे हल्लेखोर पळून गेल्यामुळे संदीपचे प्राण वाचले, दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांच्या मोटारीचा पाठलाग केला असता हल्लेखोरांनी कार सोडून रेल्वे रुळावरून पळून गेले होते. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या हल्लेखोरांचा कसून शोध घेण्यात येत असताना हे दोघे हल्लेखोर ट्रकमधून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाने तांत्रिकदृष्ट्या तपास करून हितेश गुलबीर ठाकूर आणि सागर किरण शिंदे नाशिक येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची चौकशी करण्यात आली असता हल्ल्यात जखमी झालेला संदीप गायकवाड आणि आरोपी हितेश ठाकूर यांच्या आपापसात वैर होते, यातून संदीपने हितेशच्या हत्येची सुपारी काही भाडोत्री गुंडांना दिली होती. संदीपने आपल्या हत्येची सुपारी दिल्याचे कळताच संतापलेल्या हितेशने संदीपच्याच हत्येचा कट रचला.

बुधवारी संधी मिळताच हितेश आणि सागर या दोघांनी मोटारीतून येऊन संदीपवर गोळीबार केला. मात्र संदीपच्या पायाला गोळी लागल्यामुळे या दोघांनी लोखंडी रॉडने त्याला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हितेश आणि सागर या हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपासासाठी या दोघांचा ताबा विठ्ठलवाडी पोलिसांकडे सोपवण्यात आला असल्याचे कोथमिरे यांनी सांगितले.

First Published on: October 23, 2020 7:33 PM
Exit mobile version