येत्या १९ मार्चला कळव्यात रंगणार शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धा

येत्या १९ मार्चला कळव्यात रंगणार शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धा

गणेशोत्सवासह शिमगाोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अंत्यत आत्मियतेचा सण. या सणासाठी ठाणे- मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जुन गावी जात असतात. मात्र, ज्यांना काही कारणांनी गावी जाणे शक्य नाही  त्यांच्यासाठी  माजी मंत्री नामदार डॉ. जितेंद्रजी आव्हाड यांच्या संकल्पनेतून कळवा येथेच शिमगोत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १९ मार्च २०२३ रोजी कळवा येथील खारलँड मैदानामध्ये(सह्याद्री शाळे समोर) हा कोकणचा शिमगोत्सव पारंपारिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेवून आणण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, या निमित्ताने  ठाण्यात प्रथमच पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले असून, रत्नागिरी व रायगड  या जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत. या निमित्ताने कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपारिक पालखी नृत्य हे ठाणे-मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास दोन लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक; द्वितीय विजेत्यास एक लाख एकावन्न हजार रुपये व आकर्षक चषक; तृतीय विजेत्या संघाला एक लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक तर सर्व सहभागी संघाना  प्रत्येकी २५ हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. गेली ११ वर्षे माजी मंत्री तथा  आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून या वर्षी पालखी नृत्य स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश उत्सव साजरे करण्याबरोबरच, भारतीय परंपरा व संस्कृतीची सर्व जगाला ओळख व्हावी,  हाच आहे, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

First Published on: March 14, 2023 9:51 PM
Exit mobile version