उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी; अंबरनाथ व कल्याणमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी; अंबरनाथ व कल्याणमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ परिसरात पडलेल्या पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उल्हास नदीवरील बदलापूर बॅरेज, जांभूळ बंधारा व मोहने बंधारा येथे नदीच्या पाणी पातळीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे ठाणे पाटबंधारे विभागाने सांगण्यात आले आहे.

गेल्या काही काळात ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. उल्हास नदीच्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ तालुक्यातील नदी परिसरात तसेच उल्हासनगर व कल्याण तालुक्यातील नदीच्या परिसरात पाणी भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.

उल्हास नदीवरील बदलापूर बॅरेजमधील पाणी पातळीची इशारा पातळी १६.५० मीटर इतकी असून आता बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत पाणी पातळी इशारा पातळीच्या वर १७.२० मीटर इतकी झाली आहे. जांभूळ बंधारा येथील नदीची इशारा पातळी १३ मीटर असून सध्या येथे धोका पातळीच्या वर १४.५७ मीटर इतकी पाणी पातळी आहे.

कल्याण तालुक्यातील मोहने बंधारा येथे नदीची इशारा पातळी ९ मीटर असून सध्या येथे ०९.३३ मीटर इतकी पाणी पातळी आहे. उल्हास नदीची पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासनाने नदी काठावरील व परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


नागपूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, नवेगाव खैरी धरणाचे उघडले १६ दरवाजे

First Published on: July 13, 2022 6:52 PM
Exit mobile version