Thane : कळवा रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरूच; एका महिन्याच्या बाळासह चार रुग्णांचा मृत्यू

Thane : कळवा रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरूच; एका महिन्याच्या बाळासह चार रुग्णांचा मृत्यू

Thane : ठाण्यातील (Thane) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) गुरुवारी (10 ऑगस्ट) 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी (13 ऑगस्ट) अवघ्या 10 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज (14 ऑगस्ट) पुन्हा 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. धक्कादायक बाब अशी की, या रुग्णांमध्ये एका महिन्यांचा बाळाचाही समावेश आहे. त्यामुळे रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) यांनी चौकशीचे आदेश दिले होते. (Thane Kalwa hospital death session continues Four patients died including a one month old baby)

हेही वाचा – 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त – मुख्यमंत्री

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ताण आहे. सध्या साथीच्या रोगा असतानाच कळवा रुग्णालयात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण अवघ्या 4 दिवसांत 27 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजकीय नेत्यांकडून रुग्णालय प्रशासनाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 10 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल 18 रुग्णांचा मृत्यू झाला. यातील 18 पैकी 13 रुग्ण आयसीयूमध्ये होते तर, 5  रुग्णांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे.

हेही वाचा – अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयावर ताण

कळवा रुग्णालयात 500 बेड्सची क्षमता आहे. परंतु साथीचे आजार आणि अतिरिक्त रुग्ण संख्येमुळे दीडशे-दोनशेहून अधिक बेड्सची संख्या वाढवण्यात आली आहे. वॉर्डामध्ये जागा मिळेल तिथे बेड लावून रुग्णांवर उपचार होत आहेत. एका वॉर्डमध्ये 49 रुग्णांची क्षमता असतानाही सध्या 89 रुग्णांवर एक परिचारिका उपचार करत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कळवा रुग्णालयात मनुष्यबळ व जागाही कमी पडत आहे. रुग्णालयात दररोज ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा, पालघर, उल्हासनगर, डोंबिवली, जव्हार, वाडा, भिवंडी अशा विविध भागांतून रुग्ण येत असल्याचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी सांगतिले आहे.

रुग्णांची मृत्यूची कारणे

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, आतापर्यंत जे रुग्ण दगावले त्यातील काही रुग्णांचा अपघातग्रस्त होते तर, काही रुग्णांचा अल्सर, यकृत व्याधी, निमोनिया, विष प्राशन, डायलेसीस, डोक्याला मारहाण, लघवी संसर्ग, ऑक्सिजनची कमतरता, रक्तदाब कमी होणे, ताप आदींमुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका 83 वर्षीय वृद्ध महिलेसह 81 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे तर, उर्वरित रुग्ण हे 33 ते 83 वयोगटातील आहेत.

First Published on: August 14, 2023 4:46 PM
Exit mobile version