ठाणे पालिकेच्या रुग्णालयात चिकनगुनियाचे इंजेक्शनच नाही; महासभेत धक्कादायक बाब उघडकीस

ठाणे पालिकेच्या रुग्णालयात चिकनगुनियाचे इंजेक्शनच नाही; महासभेत धक्कादायक बाब उघडकीस

महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका महिलेला चिकणगुनियाच्या उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, त्या महिलेला या आजारावरील इंजेक्शनच मिळत नाही. अशी धक्कादायक बाब सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत उघड केल्यावर प्रशासनाने केवळ फार्मासीस्टचे बील अदा करण्यात न आल्याने संबधींत कंपनीने ते इंजेक्शन न दिल्याचे मान्य केले आहे. यावेळी, महापौर नरेश म्हस्के यांनी औषधांची बिले तत्काळ अदा करुन त्या महिलेला इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे असेच आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

 

शिवसेनेच्या नगरसेविका मीनल संख्ये यांनी शहरात डेंग्यु आणि इतर आजारांचे रुग्ण किती आहेत याची माहिती ठामपा आरोग्य विभागाला विचारला. त्यावेळी,आरोग्य विभागाने शहरात ऑगस्ट महिन्यात मलेरीयाचे ३६, डेंग्यु सदृष्य १३, चिकणगुनिया आणि लेप्टोचे प्रत्येकीने २ रुग्ण आढळले असल्याचे स्पष्ट केले. तर, यावेळी शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी रघुनाथ नगर भागात एका महिलेला चिकणगुनियाची लागण झाली असून तिला उपचारार्थ महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

परंतु तिच्या उपचारार्थ लागणारे चिकणगुनियावरील आयव्हीएलजी ५ एमजीचे इंजेक्शन अद्यापही मिळाले नसल्याची माहिती दिली. या महिलेला ते इंजेक्शन का दिले जात नाही, असा प्रश्न ही त्यांनी यावेळी त्यांनी विचारला असता, त्यावर मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर यांनी ज्या फार्मासीकडून हे इंजेक्शन घ्यायचे आहे, त्याचे आधीचे बील न दिल्याने त्याने इंजेक्शनचा पुरवठा केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. भिमराव जाधव यांच्याकडून महापौर नरेश म्हस्के यांनी या विषयीची माहिती घेतली असता, त्यांनी देखील बील अदा न केल्यानेच इंजेक्शन दिले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

संबधींताचे बील मिळावे यासाठी मुख्य लेखाधिकाऱ्यांना सांगण्यात आले असून त्यांनी बील न काढल्याची माहिती जाधव यांनी दिली. दरम्यान महापौर नरेश म्हस्के यांनी संबधींत फार्मासीचे पैसे तत्काळ अदा करुन इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यावर गुरुवारी इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचेही आरोग्य विभागाने जाहीर केले.

 

हे ही पहा- सुसाई़ड नोट लिहून घेऊन हत्या करायची ही परमबीर सिंग यांची स्टाईल; नाशिकचे उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांचा आरोप

First Published on: August 18, 2021 7:39 PM
Exit mobile version