भिवंडीत उपजिल्हा रुग्णालयाबाहेर महिलेची प्रसूती

भिवंडीत उपजिल्हा रुग्णालयाबाहेर महिलेची प्रसूती

भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रूग्णालयातील कर्मचार्‍याने गर्भवती महिलेस रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिल्याने त्या गर्भवती महिलेची रूग्णालयाच्या आवारातच पडद्याआड प्रसूती केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी महिलेच्या रक्तस्त्रावामुळे हा परिसर रक्तबंबाळ झाला होता.तर महिलेच्या पतीने रुग्णालयातील प्रसूती विभागाविरोधात निष्काळजीपणाची तक्रार शांतीनगर पोलिस ठाण्यात दिली असून आयजीएम रुग्णालय प्रशासनाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

भिवंडीतील शांतीनगर भागात राहणारा अफसर शेख शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता आपल्या गर्भवती पत्नीला प्रसूतीसाठी स्थानिक आयजीएम रुग्णालयात घेऊन गेला.परंतु महिलेची प्रकृती अस्थिर असतानाही प्रसूती वॉर्डातील डॉक्टरांसह रूग्णालयातील कर्मचार्‍यांनी महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यास नकार दिला. चार तास विनवण्या करूनही महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले नाही. त्यानंतर जमिनीवर पडलेल्या महिलेने रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रूग्णालयाच्या आवारातच एका बाळाला जन्म दिला.उपस्थित महिलांनी एकत्र येऊन महिलेची पडद्याआड प्रसूती केली.परंतु प्रसूतीदरम्यान महिलेला जास्त रक्तस्त्राव झाल्याने मुख्य गेटसह रुग्णालयाचा परिसर रक्ताने लाल झाला होता. माहिती मिळताच प्रसूती विभागातील कर्मचार्‍यांनी तूर्तास महिलेला रुग्णालयात नेले.त्यानंतर भरती करून फरशी साफ केली.

महिलेच्या पतीने सांगितले की, डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणामुळे प्रसूती दरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने पत्नी बेशुद्ध झाली. त्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. महिलेचा पती अफसर शेखने रुग्णालयातील प्रसूती वॉर्डातील सर्व कर्मचार्‍यांवर निष्काळजीपणा व जीवाशी खेळ केल्याचा गंभीर आरोप केला असून रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या या बेजबाबदार वृत्तीविरोधात रविवारी रात्री 12 वाजता शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.तर सद्यस्थितीत महिलेसह बाळ सुस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.

रुग्णालयातील मनमानी संदर्भात आयजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,गर्भवती महिलेच्या रक्ताचे प्रमाण (हिमोग्लोबिन) 4 पॉईंट असल्याने महिलेच्या जीवितास धोका होता. तसेच प्रसूतीसाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पुरेशी साहित्य सामुग्री नसल्याने अधिक उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्याचे पत्र दिले होते. मात्र महिलेच्या पतीने त्यास नकार देत प्रसूती इंदिरा गांधी रुग्णालयातच करण्याचा हट्ट धरला. तो रुग्णालयातून बाहेर निघाला त्यावेळी गर्भवती महिलाही त्याच्या पाठीमागे बाहेर निघाली, मात्र त्यावेळी महिलेस प्रसूती कळा असह्य झाल्याने तिची रुग्णालयाच्या आवारात प्रसूती झाल्याचे मोरे यांनी सांगितले.

First Published on: February 13, 2023 9:09 PM
Exit mobile version