राज्यात ६२ हजाराहून अधिक अंध मतदार

राज्यात ६२ हजाराहून अधिक अंध मतदार

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ६२ हजार ३६६ अंध मतदारांची तर ३ लाख ९६ हजार ६७३ दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांमध्ये ३८ हजार ७६३ मूकबधीर, हालचाल करण्यास अक्षम, असे व्यंग असलेले १ लाख ७६ हजार ६१५ आणि अन्य स्वरुपाचे १ लाख १८ हजार ९२९ दिव्यांग यांचा समावेश आहे.

राज्यातील ९६ हजार ६६१ मतदान केंद्रांपैकी ६५ हजार ४८३ मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात १७ हजार ९५७ मतदान केंद्रावर मूकबधीर, ४२ हजार ९०५ मतदान केंद्रावर हालचाल करण्यास अक्षम, असे दिव्यांग आणि २० हजार ४६५ हजार मतदान केंद्रावर अन्य स्वरुपाचे व्यंग असलेल्या मतदारांची नोंद झाली आहे. तसेच २३ हजार १०१ मतदान केंद्रावर ६२ हजार ३६६ अंध व्यक्तींची नोंद झाली आहे. या सर्व मतदान केंद्रांवर किमान अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येतील. मतदान खोलीपर्यंत सुलभतेने जाण्यासाठी रॅम्प, व्हीलचेअरची सुविधा पुरविण्यात येईल. मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था असेल. त्यांना मदत करण्यासाठी ‘दिव्यांग मित्र स्वयंसेवक’ असतील. दिव्यांग मतदारांना सुलभ निवडणुकीचा आनंद मिळेल यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

इव्हीएमवर ब्रेल भाषेतील मतपत्रिका

अंध व्यक्तींना मतदान करणे सोपे जावे यासाठी लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये इव्हीएमवर ब्रेल भोषत मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदानाला येणार्‍या अंध व्यक्तीला मतदान करताना सहाय्यकाची गरज लागते. ही बाब लक्षात घेऊन त्यांना मतदान केंद्रावर ब्रेल भाषेत मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर कोणत्या उमेदवारासाठी कोणते बटण असणार याची माहिती त्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर मतदान करताना अंध व्यक्तींना कोणाची गरज भासू, नये यासाठी प्रत्येक इव्हीएम मशीनवर ब्रेल भाषेत आकडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान करताना अंध मतदार मशीनवरील ब्रेल भाषेतील आकड्यांच्याद्वारे उमेदवाराची ओळख पटवून सहजपणे मतदान करू शकतो, अशी माहिती कलिना विधानसभा निवडणूक अधिकारी पंकज देवरे यांनी दिली आहे.


हेही वाचा – विधानसभा निवडणूकीसाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज


 

First Published on: October 19, 2019 9:53 PM
Exit mobile version