या संकटकाळात काँग्रेससाठी मी ‘बाजीप्रभू’ : बाळासाहेब थोरात

या संकटकाळात काँग्रेससाठी मी ‘बाजीप्रभू’ : बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार्‍यांवर टीका केली आहे. काँग्रेस अडचणीत असताना अनेकजण पक्ष सोडून गेले आहेत, पळून जाण्यात काय अर्थ? संकट काळात काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर इथे झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित होते.

काँग्रेस अडचणीत असताना अनेकजण सोडून गेले, पण मी काँग्रेसची खिंड बाजीप्रभू देशपांडेंसारखी लढवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य अडचणीत असताना बाजीप्रभू देशपांडे यांनी पळून न जाता खिंड लढवली होती. आता काँग्रेसपक्ष अडचणीत असताना देखील मी असेच काम करत आहे. संकट काळात काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे,असे थोरात म्हणाले.

इतिहास तोच घडवतो जो सातत्याने लढत राहतो. घर पेटले तर तुम्ही पळून जाणे योग्य नाही, असा टोलाही थोरात यांनी यावेळी पक्षातील गयारामांना लगावला. सरड्यापेक्षा वेगाने रंग बदलणारे काही नेते महाराष्ट्रात आहेत. आम्ही असे पळपुटे नाहीत. पक्षासोबत खंबीरपणे उभे राहणार आहोत. पक्षाध्यक्ष कुठे दिसत नाही, असे विचारणारे साडेचार वर्षे विरोधी पक्षनेते होते का? कारण विरोध करताना ते कुठे दिसलेच नाहीत. याचबरोबर या निवडणुकीत काँग्रेस नव्या जोमाने उभारी घेईल, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

First Published on: October 9, 2019 1:28 AM
Exit mobile version