गोपीचंद पडळकरांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी – मुख्यमंत्री

गोपीचंद पडळकरांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी – मुख्यमंत्री

गेल्या दोन दिवसांपासून भाजपच्या ज्या मेगाभरतीसंदर्भात चर्चा सुरू होती, ती मेगाभरती अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गरवारे क्लब येथे पार पडली. यावेळी शिरपूरचे काँग्रेस आमदार काशीराम पावरा आणि वंचित बहुजन आघाडीला दोनच दिवसांपूर्वी रामराम ठोकलेले गोपीचंद पडळकर यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. यावेळी शिरपूर काँग्रेसच्या अध्यक्षांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय अमरिश पटेल हे देखील येत्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये दाखल होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं. दरम्यान, यावेळी गोपीचंद पडळकर बारामतीमधून निवडणूक लढणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले.

‘धनगर समाजाला २२ योजना लागू केल्या’

‘गोपीचंद पडळकर पुन्हा घरात परत आले आहेत. त्यांनी धनगर समाजासाठी एक व्रत स्वीकारलं आणि समाजाचे प्रश्न घेऊन महाराष्ट्रभर काम केलं. आदिवासी समाजाला लागू होणाऱ्या २२ योजना धनगर समाजासाठी लागू करण्याचा निर्णय पडळकरांशी चर्चेनंतर आम्ही घेतला. त्यासाठी १ हजार कोटींचा निधी देखील दिला. त्या योजनांचा आता धनगर समाजाला फायदा होऊ लागला आहे’, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘पडळकरांनी वंचितच्या माध्यमातून लोकसभेत उभं राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला दु:ख झालं. पण समाजाच्या भावना लक्षात ठेवत त्यांनी तो निर्णय घेतला होता. भविष्यात आमच्यासोबत राहिलात, तर अधिक चांगले निर्णय घेऊ शकाल, असं मी त्यांना नंतर पटवून दिलं. त्यामुळे शेवटी त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला’, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पडळकर बारामतीमधून लढणार निवडणूक

दरम्यान, यावेळी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. ‘गोपीचंद पडळकरांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी. पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण तयारी असेल, तर मी पक्षनेतृत्वाशी त्यासंदर्भात बोलतो’, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे बारामतीमध्ये पडळकरांच्या रुपाने अजित पवारांना थेट आव्हान देण्याची खेळी मुख्यमंत्र्यांनी खेळली असल्याचं बोललं जात आहे.

First Published on: September 30, 2019 1:18 PM
Exit mobile version