काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होणार; ५० नावांचा समावेश

काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होणार; ५० नावांचा समावेश

काँग्रेस

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून शुक्रवारी पहिली यादी जाहीर होण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या यादीत एकूण ५० जणांची नावे असणार असून या यादीत नेमकी कोणाची नावे जाहीर होतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या पहिल्या यादीत अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, महाआघाडीतील घटकपक्षांबरोबर जागा वाटपाबाबत चर्चा सुरु असताना काँग्रेसकडून यादी जाहीर केली जाणार असल्याने घटक पक्षांचे देखील या यादीकडे लक्ष लागून राहिले आहे.

कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी काँग्रेसची तयारी

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यातच अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला असल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल उंचवावे यासाठी काँग्रेसने गेल्या अनेक दिवसांपासून जय्यत तयारी सुरु आहे. त्याच अनुषंगाने पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती तातडीने पूर्ण केल्यानंतर आता काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या यादी देखील निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी पहिली यादी जाहीर केली जाणार आहे.


हेही वाचा – उर्मिला मातोंडकर काँग्रेसचा ‘हात’ सोडून बांधणार शिवबंधन?

काँग्रेसकडून विभागवार नेत्यांची निवड

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता ऑल इंडिया काँग्रेस समितीकडून विभागवार नेत्यांची नियुक्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आला. त्यानुसार एकूण पाच नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली असून विदर्भासाठी मुकूल वासनिक यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई विभाग आणि निवडणूक कंट्रोल रुमसाठी अविनाश पांडे यांची निवड करण्यात आली आहे. तर रजनी पाटील यांची निवड पश्चिम आणि कोकण विभागासाठी करण्यात आली आहे. याशिवाय आर. सी. खुंटिया आणि राजीव सातव यांची निवड अनुक्रमे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी करण्यात आली आहे. के. सी. वेणुगोपाल यांनी या नावांची घोषणा केली आहे.

First Published on: September 19, 2019 10:04 PM
Exit mobile version