फडणवीसांची विधानसभेत शायरी; म्हणे, ‘मैं समुंदर हूँ’! भुजबळांनाही टोला!

फडणवीसांची विधानसभेत शायरी; म्हणे, ‘मैं समुंदर हूँ’! भुजबळांनाही टोला!

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या ‘पुन्हा येईन’ या वाक्याची. सोशल मीडियावर तर या वाक्याने धुमाकूळ घातला आहे. फडणवीस यांच्या याच वाक्याची आज पुन्हा एकदा सभागृहात चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांची आज विधानसभा विरोधीपक्ष नेते पदी निवड झाल्यानंतर अभिनंदन प्रस्ताव मांडताना जयंत पाटील यांनी मी पुन्हा येईन असे म्हणत फडणवीस यांच्या या वाक्याची खिल्ली उडवली. मात्र याला विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी देखील जशास तसे उत्तर दिले आहे. ‘मी पुन्हा येईन म्हणालो होतो. पण टाइम टेबल सांगितले नव्हते. तुम्ही वाट बघा’, असे सांगत त्यांनी जयंत पाटील यांच्या वाक्यावर टोला लगावला. तसेच, ‘मी जाहीर केलेल्या सगळ्या प्रकल्पांची सुरुवात झाली आहे. कदाचित त्यांचं उद्घाटन देखील मीच करीन. जयंत पाटील, तुमच्या गाडीत जायचं की आमच्या तेवढं फक्त सांगा’, असं फडणवीस यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

फडणवीसांची शायरी…!

दरम्यान, यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी शायरीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका केली.

मेरा पानी उतरता देख
मेरे किनारे पे घर मत बसा लेना
मैं समुंदर हूँ
लौट के फिर वापस आऊँगा…!


हेही वाचा – राज ठाकरेंच्या नावाने भुजबळांचा थेट फडणवीसांना टोला!

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर देवेंद्र फडणवीसांनी यावेळी शायरीच्या माध्यमातून निशाणा साधतानाच त्यांच्यावर टीका देखील केली. ‘ज्या दिवशी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले, त्या दिवशी राजकारणात काहीही होऊ शकतं हे सिद्ध झालं आहे’, असं यावेळी फडणवीस म्हणाले.

‘भुजबळसाहेब तुमच्यासोबत पुन्हा सत्तेत येईन’

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘जर जर पुन्हा आलो तर भुजबळ साहेब तुमच्या सोबत येऊ’, असे सांगत ‘आता राजकारणात काही अशक्य राहिले नाही. कारण जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात तर काहीही होऊ शकते’, असे ते म्हणाले. तसेच, ‘मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही आवाज द्या, सकारात्मक प्रतिसाद देईन. पण जेव्हा वाटेल सरकार जनतेची इच्छापूर्ती करत नाही तेव्हा आसूड देखील ओढू’, असं देखील ते म्हणाले.

First Published on: December 1, 2019 3:25 PM
Exit mobile version