हर्षवर्धन पाटील म्हणजे बुलेटप्रूफ जॅकेट

हर्षवर्धन पाटील म्हणजे बुलेटप्रूफ जॅकेट

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून इंदापूरची उमेदवारी जाहीर

पाच वर्षांपासून काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हे भाजप प्रवेशाची वाट बघत होते. संसदीय कार्यमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी प्रदीर्घ काळ काम केले. सर्वांना सोबत घेण्याची हातोटी त्यांच्याजवळ आहे. त्याचा उपयोग आम्हाला निश्चितपणे होईल. त्यांच्या गाठीशी जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा भाजपला आणि युती सरकारला मिळेल, हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस सरकारच्या काळात बुलेटप्रूफ जॅकेट म्हणून काम केले, असे गौरवोद्गार बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काढले.

काँग्रेसचे इंदापूरमधील प्रभावी नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमैय्या, प्रसाद लाड, राज पुरोहित, किसन कथोरे, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी. आणि प्रदेश प्रवक्ते अतुल शाह उपस्थित होत

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा निवडून आणणार असून त्यामध्ये आता इंदापूरचादेखील समावेश झाला आहे. इंदापूर मतदारसंघातल्या समस्या आणि पाणीप्रश्नावर उपाययोजना करण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी हर्षवर्धन पाटील यांना दिले. काँग्रेस सरकारच्या काळात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसाठी पाटील यांनी बुलेटप्रूफ जॅकेट म्हणून काम केले. आमच्या प्रश्नांच्या बुलेट सरकारच्या दिशेने जायच्या, त्या आधी त्या हर्षवर्धन पाटील झेलायचे आणि नंतर त्या पुन्हा आमच्याकडे आणून द्यायचे. शिवाय सामंजस्याने प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कायमच कल राहिला आहे. संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन विधान सभेत काम केले, असे मुख्यंमत्री म्हणाले.

पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू – हर्षवधन पाटील
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणे हे आपल्यासाठी ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या शंभर दिवसांत घटनेचे कलम 370 रद्द करण्यासोबत अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखरपणे सरकारचे नेतृत्व केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच राज्याला न्याय देऊ शकेल, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत निष्ठा, तत्व आणि प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. आपण भाजपामध्ये प्रवेश करताना कोणतीही अट घातलेली नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

First Published on: September 12, 2019 6:45 AM
Exit mobile version