मी स्वतः शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार घेणार – शरद पवार

मी स्वतः शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार घेणार – शरद पवार

ईडीबाबात भूमिका स्पष्ट करताना शरद पवार

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल खुलासा केला. “विधानसभा निवडणूक असल्यामुळे मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे ईडीला माझ्याशी संपर्क साधायचा असल्यास,  ‘मी कुठे अदृश तर झालो नाही?’, असा ईडीचा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. तिथल्या अधिकाऱ्यांना माझ्यासंदर्भात काही माहिती हवी असल्यास ती मी देईल तसेच  त्यांचा जो काही अन्य पाहुणचार असेल तोही घेण्याची माझी तयारी आहे.”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

ईडीच्या कारवाईनंतर शरद पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या तख्तासमोर झुकलेला नाही. हे शिव छत्रपतींचे राज्य आहे. त्यांचे संस्कार राज्यावर आहेत. त्यामुळे दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा महाराष्ट्राचा इतिहास नाही.”, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. मी सध्या राज्याचा दौरा करत आहे, मला ठिकठिकाणी लोकांचा जबरदस्त पाठिंबा मिळतोय. माझा दौरा रोखण्यासाठी ही कारवाई केली जात आहे का? याबद्दलही पवारांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, फुले-शाहु-आंबेडकर यांच्याप्रती मी आस्था ठेवणारा आणि संविधानावर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. त्यामुळे माझे ईडीला निश्चितच पुर्णपणे सहकार्य असेल, असेही शरद पवार म्हणाले.

मी कधीही बँकेच्या संचालक मंडळावर नव्हतो

राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातील महत्त्वाची बँक आहे. राज्यातील जनतेला शेती, सहकार संस्था यासाठी कर्ज देण्याची भूमिका ही बँक बजावत असते. या बँकेमध्ये अनेक पक्षांचे नेते संचालक मंडळावर होते. भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर हे देखील संचालक होते. शिवसेनेचे आनंदराव अडसुळ, तसेच काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते देखील संचालक होते. विशेष म्हणजे या संचालकांची निवड कोणत्याही निवडणुकीशिवाय बिनविरोध झालेली होती. मी स्वतः कधीही सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर नव्हतो. मात्र तरिही ईडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला असेल तर माझे कर्तव्य आहे की मी त्यांना पुर्ण सहकार्य करावे, यासाठी त्यांची नोटीस येण्याआधीच मी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार आहे.

 

 

First Published on: September 25, 2019 3:11 PM
Exit mobile version