कर्जतमध्ये राष्ट्रवादीची हॅटट्रिक रोखण्यासाठी शिवसेना सज्ज

कर्जतमध्ये राष्ट्रवादीची हॅटट्रिक रोखण्यासाठी शिवसेना सज्ज

कर्जत विधानसभा मतदारसंघात महिनाभरापासून घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा पहिला अंक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी लढत होणार हे तेव्हाच स्पष्ट झाले आहे. सलग दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश लाड यावेळी हॅटट्रिकसाठी सज्ज झाले आहेत. शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांनी मात्र लाड यांना हॅटट्रिकपासून वंचित ठेवण्याचा चंग बांधला आहे.

कर्जत विधानसभा म्हणजे शिवसेना या समीकरणाला शिवसेनेतील बंडखोरांनी छेद दिल्यामुळे 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. 2014 चे उमेदवार यंदा आमनेसामने असणार आहेत. फरक एवढाच आहे की गेल्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार असलेले थोरवे यावेळी मात्र शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. शिवसेनेतील बंडखोरांना आणि इच्छुकांना थोरवे यांनी शांत करण्यात यश मिळवले आहे. पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी हनुमंत पिंगळे पक्षाबाहेर गेल्यामुळे थोरवेंचा सुंठेवाचून खोकला गेला आहे. राष्ट्रवादीत उघड बंडखोरी नसली तरी ज्येष्ठ नेते आणि नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले दत्तात्रेय मसुरकर यांच्या नाराजीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

2014 ला शिवसेना, राष्ट्रवादी आणि शेकाप अशी तिरंगी लढत झाली होती. लाड यांनी अवघ्या बावीसशे मतांनी विजय मिळविला होता. थोरवे यांनी दुसर्‍या क्रमांकाची मते घेताना शिवसेनेचे उमेदवार हनुमंत पिंगळे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राष्ट्रवादीने ग्रामीण भागात पकड घट्ट केली आहे. खालापुरात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला अनेक ठिकाणी राष्ट्रवादीने धोबीपछाड दिला आहे. 20 वर्षांनंतर पंचायत समिती आणि तीन जिल्हा परिषद सदस्य निवडून आणताना खालापुरात शिवसेनेच्या गडाला सुरूंग लागला आहे. खालापूर तालुक्याचा शहरी भाग वगळता मागील पाच वर्षांतील राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आकडेवारीत क्रमांक एकचा पक्ष बनला आहे.

2017 साली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेकापच्या साथीमुळे राष्ट्रवादीला भरघोस यश मिळाले आहे. पाऊण लाख मतदारांपैकी 50 टक्के मतदारांनी घड्याळाची टीकटीक पसंत केली. जिल्हा परिषदेच्या चार गटांपैकी तीन गटांत राष्ट्रवादीने बाजी मारली, तर सेनेला फक्त एक गड शाबूत ठेवता आला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 72 हजार 207 मतदारांपैकी 34 हजार 956 मतदारांनी राष्ट्रवादी व शेकाप आघाडीला पसंती दिली होती. शिवसेनेच्या मतांची आकडेवारी 26 हजार 580 एवढी होती. भाजपला स्वंतत्र लढून दोन ठिकाणी केवळ 2 हजार 189 मते मिळाली होती.

राष्ट्रवादी-शेकाप आघाडी आणि शिवसेना यांच्या मतांतील फरक पाहिला तर 8 हजार 376 इतका होता. ग्रामीण भागात आकडेवारीत राष्ट्रवादी सरस दिसत आहे. शेतकरी कामगार पक्षाची मिळालेली सोबत यामुळे सुरेश लाड यांना हॅटट्रिकची शक्यता आहे. शिवसेनेला भाजपची मनापासून किती साथ मिळणार, यावर थोरवे यांचे भवितव्य ठरणार आहे.

First Published on: October 8, 2019 5:34 AM
Exit mobile version