भाजपमध्ये विलीनीकरणासाठी राणेंचा नवा मुहूर्त!

भाजपमध्ये विलीनीकरणासाठी राणेंचा नवा मुहूर्त!

गेल्या दोन महिन्यांपासून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे वेगवेगळे मुहूर्त जाहीर करणारे आणि तरीही अद्याप प्रवेशाच्या प्रतिक्षेतच असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आता भाजप प्रवेशाचा नवा मुहूर्त जाहीर केला आहे. राणेंनी सांगितल्याप्रमाणे आता त्यांच्या स्वाभिमान पक्षाचं येत्या १५ ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. या विलीनीकरणासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याचं देखील राणेंनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. सावंतवाडीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणेंनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता तरी नारायण राणेंचा खरोखर भाजपप्रवेश होणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

हा मुहूर्त तरी साधला जाईल का?

याआधी नारायण राणेंनी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या आणि स्वाभिमान पक्षाच्या भाजपमध्ये विलीनीकरणाच्या अनेकदा घोषणा केल्या आहेत. कधी कणकवलीत, कधी दिल्लीत पंतप्रधानांच्या उपस्थितीत तर कधी मुंबईत मुख्यंमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं त्यांनी स्वत:च जाहीर केलं होतं. पण त्याला मुहूर्त काही मिळत नव्हता. अखेर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरायला एक दिवस शिल्लक असताना फक्त नितेश राणेंचा आणि तोही कणकवलीमधल्या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याच्या अर्थात प्रमोद जठार यांच्या हस्ते भाजप प्रवेश करण्यात आला. मात्र, फक्त नितेश राणेंचाच! नारायण राणे अजूनही प्रतिक्षेतच होते. मात्र, पुन्हा एकदा नारायण राणेंनी त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त जाहीर केला आहे.


हेही वाचा – …तर मी देखील संघ शाखेत जाईन-नारायण राणे

‘दीपक केसरकरणांनी काय केलं?’

दरम्यान, यावेळी नारायण राणेंनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि सावंतवाडीचे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर देखील निशाणा साधला. ‘गेली दहा वर्ष सावंतवाडीचं नेतृत्व करणारे पालकमंत्री केसरकर हे सावंतवाडीचा विकास करण्यात अपयशी ठरले आहेत. दहा वर्षात सावंतवाडी विकासाच्या बाबतीत मागे गेले असून केसरकर फक्त खोट्या घोषणा देत आहेत. इकडच्या जनतेची फसवणूक करत आहेत’, असेही राणे यावेळी म्हणाले.

First Published on: October 10, 2019 5:43 PM
Exit mobile version