राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार? रामराजे निंबाळकरांचे पक्षांतराचे सूतोवाच

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार? रामराजे निंबाळकरांचे पक्षांतराचे सूतोवाच

रामराजे नाईक निंबाळकर

अवघ्या तीन आठवड्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. याआधी देखील रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र, ऐन वेळी त्यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचं जाहीर करत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. आता मात्र, ‘साताऱ्याची राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पक्षाबाहेर जावं लागलं, तर त्याचा निर्णय दोन दिवसांत जाहीर करेन’, असं रामराजे निंबाळकर म्हणाले आहेत. असं झाल्यास ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसू शकतो.

दोन दिवसांत पक्षांतराविषयी भूमिका स्पष्ट करणार

साताऱ्यातलं बडं प्रस्थ असलेल्या उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली. आगामी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत तेच भाजपचे उमेदवार असतील. मात्र, त्यानंतर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुढील रणनीतीसंदर्भात कोणतीही योजना हाती न आल्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर अस्वस्थ झाले आहेत. ‘गेल्या महिन्याभरापासून माझ्या भाजप प्रवेसाच्या चर्चा सुरू आहेत. पण मी त्यावर काहीही सांगितलेलं नाही. तालुक्याचं राजकारण आणि जिल्ह्याचं राजकारण वेगळं आहे. माझ्या आजोबांच्या कामाचा माझ्यावर प्रभाव आहे. आता राष्ट्रवादी सोडणार की नाही याविषयी अद्याप मी काहीही बोललेलो नाही. पवारांनी सोनिया गांधींशी केलेलं बंड आम्हाला आवडलं होतं. पण आता सातारा जिल्ह्यातली राजकीय परंपरा टिकवावी लागेल. मग भलेही त्यासाठी पक्षाबाहेर जाऊन काम करावं लागलं, तरी मी करेन’, असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.

First Published on: October 2, 2019 1:05 PM
Exit mobile version