सेना-भाजप युती तुटणं मराठी माणसासाठी हानिकारक – गडकरी

सेना-भाजप युती तुटणं मराठी माणसासाठी हानिकारक – गडकरी

‘भाजप आणि सेनेची युती ही हिंदुत्वाच्या विचारांवर होती. त्यामुळे अनेक वर्ष आम्ही एकत्र राहिलो. याशिवाय आजही आमच्या विचारांमध्ये मतभिन्नता नाही. त्यामुळे अशाप्रकारची युती न टिकणे हे देशासाठी, हिंदुत्त्वासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी हानिकारक आहे’, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले. दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे होते. त्यामुळे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसले. अखेर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या तीन आठवड्यांपासून घडामोडी घडत आहेत. महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्षांचे जवळपास एकमत झाल्याचे निश्चित असल्याचे बोलले जात असून येत्या दोन ते तीन दिवसांत सरकार स्थापन होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.


हेही वाचा – शपथविधीपर्यंत पवार कुठल्या बाजूला जातील माहीत नाही – बच्चू कडू


महाविकासआघाडीचं सरकार फार काळ टिकणार नाही – गडकरी

महाविकासआघाडी संदर्भात नितीन गडकरी यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले असता ही युती फार काळ टिकणार नाही, असे उत्तर त्यांनी दिले. ‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांमध्ये वैचारिक ताळमेळ नाही. शिवसेना ज्या विचारधारेवर चालते त्या विचारधारेला काँग्रेस पूर्णपणे विरोध करते आणि काँग्रेस ज्या वितारांवर चालते त्याला शिवसेना विरोध करते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस देखील शिवसेनेच्या विचारांसोबत ताळमेळ ठेवत नाही. त्यामुळे विचार आणि सिद्धांतांच्या आधारवर ही युती झालेली नाही. त्यामुळे ही युती फार काळ टिकणार नाही आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकणार नाही. ही युती जर झाली तर या युतीमुळे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान होणार आहे. मला वाटते महाराष्ट्रात अस्थिर सरकार निर्माण होणे हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही’, असे गडकरी म्हणाले.

First Published on: November 22, 2019 3:51 PM
Exit mobile version