राज्यातील सत्ता घालवू नका; दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर वाढला दबाव

राज्यातील सत्ता घालवू नका; दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर वाढला दबाव

देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा झाला तरी मुख्यमंत्री कुणाचा होणार यावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्लीतून दबाव वाढू लागला आहे. आपलं महानगरला खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील यामध्ये लक्ष घातले असून, काहीही करा पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच बनवा तसेच महाराष्ट्रासारखे राज्य हातचे जावू देऊ नका असे मुख्यमंत्र्‍यांना या दोन्ही नेत्यांनी खडसावून सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची वाढती बार्गेनिंग पॉवर आणि दिल्लीतून वाढत असलेला दबाब यामुळे मुख्यमंत्री चिंतेत असल्याचे एका नेत्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

दिल्ली नाराज त्यात शिवसेनेने वाढवली डोकेदुखी

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप युती झाली तर त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला होईल आणि भाजप १४० च्यावर जागा जिकेंल, असा विश्वास दिल्लीश्वरांना दिला होता. तसेच महायुती मिळून २०५ च्यावर आकडा गाठेल, असे देखील सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात उलटे झाले आणि भाजप १२२ जागांवरून थेट १०५ जागांवर आली त्यामुळे महाराष्ट्रातील निकालामुळे मोदी खुश नसल्याची माहिती मिळत आहे. त्यातच आता शिवसेना देखील मुख्यमंत्री पदावरून आक्रमक असल्याने शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करणे भाजपला शक्य नाही. यामुळेच शिवसेनेशिवाय जरी सत्ता स्थापन केली तरी ती टिकवण्याची कसोटी मुख्यमंत्र्यांसमोर असणार आहे. तसेच हे सरकार टिकले नाही तर मुख्यमंत्र्यांवरच सर्व खापर फोडले जाईल याची जाणीव देखील त्यांना आहे.

हे देखील वाचा – मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे मोदी पाठ फिरवणार?

म्हणून दिल्लीचा दबाव वाढला

महाराष्ट्रासारखे राज्य हातातून गेले आणि जर महाराष्ट्रात भाजप स्वत:चा मुख्यमंत्री बसवू शकला नाही तर त्याचे दुरगामी परिणाम होऊ शकतात याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आहे. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत हे राज्य भाजपला हातचे जाऊ द्यायचे नाही. ‘काहीही करा पण सत्ता स्थापन करा’, असा इशाराच दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्र्यांसहीत भाजपच्या नेत्यांना दिला आहे. एवढेच नाही तर महत्त्वाची खाती देखील भाजपकडे ठेवा, असे देखील दिल्लीतून सांगण्यात आले आहे.

त्यामुळेच सत्ता स्थापनेची घाई

एकीकडे दिल्लीतून वाढलेला दबाव तसेच आक्रमक झालेली शिवसेना यामुळेच येत्या ५ किंवा ६ नोव्हेंबरला छोटे खानी शपथविधी सोहळा उरकून घ्यायचा त्यानंतर सभागृहात बहुमत सिद्ध करायचे, असा मुख्यमंत्र्यांचा प्लॅन आहे. त्यामुळे दिल्लीतून वाढलेला दबाव आणि आक्रमक झालेली शिवसेना यामुळे सत्ता स्थापन होईपर्यंत मुख्यममंत्र्याचा मनस्ताप वाढवणार हे मात्र नक्की.

First Published on: November 1, 2019 3:33 PM
Exit mobile version