उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या आईला अश्रू अनावर!

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या आईला अश्रू अनावर!

शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा ऐतिहासिक क्षण याची देही याची डोळा बघण्यासाठी सेना कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कवर गर्दी केली होती. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटूंब देखील शिवतीर्थावर उपस्थित होतं. यावेळी ठाकरे कुटूंबातील एक हळवा क्षण उपस्थितांनी अनुभवला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या काकू, म्हणजेच राज ठाकरे यांची आई कुंदा ठाकरे यांच्या पायापडून आर्शिवाद घेतले. या प्रसंगी कुंदा ताईंना देखील अश्रू अनावर झाले.

शिवतीर्थावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या पदाची शपथ दिली. या सोहळ्यासाठी देशभरातील नेते उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे यांच्यासोबत आले होते. शपथविधी सोहळा झाल्यानंतर देशभरातून आलेल्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. उद्धव यांनीही सर्वांची विचारपूस करत त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला.

उद्धव ठाकरे स्टेजवरून खाली उतरले आणि थेट काकू कुंदाताईंकडे गेले. त्यांच्या पायाला स्पर्श करत त्यांनी काकूंचे आशीर्वाद घेतले. यावेळी राज ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते. उद्धव यांनी वाकून नमस्कार करताच कुंदाताईंना देखील अश्रू आवरले नाहीत. त्यानंतर पुन्हा नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांनी उद्धव यांना गराडा घातला. त्यामुळे गर्दी वाढल्याने राज हे कुंदाताईंना घेऊन घरी गेले.

शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर ठाकरे कुटूंबियांनी सहकुटूंब सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरें सह्याद्री अतिथीगृहाकडे मंत्रीमंडळाच्या बैठकी करीता रवाना झाले.

First Published on: November 28, 2019 9:34 PM
Exit mobile version