सत्ता स्थापनेच्या दिशेने दिल्लीत जोरदार हालचाली; संजय राऊत – राष्ट्रवादी भेट

सत्ता स्थापनेच्या दिशेने दिल्लीत जोरदार हालचाली; संजय राऊत – राष्ट्रवादी भेट

शरद पवारांशिवाय मोदींना पर्याय आणि विरोधकांची एकजूट शक्य नाही, संजय राऊतांचे वक्तव्य

राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. “राज्यात शेतकरी अडचणीत असून प्रशासन ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यायी सरकार लवकर स्थापन झाले पाहीजे, यासाठी उद्याच्या बैठकीत आम्ही चर्चा करणार आहोत”, अशी माहिती राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांच्यात आज झाली बैठक झाली. त्यानंतर राऊत यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली.

शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची काल भेट घेतल्यानंतर सत्ता स्थापनेबाबत काहीच चर्चा झाली नसल्याचे माध्यमांना सांगितले होते. मात्र पडद्यामागून सत्ता स्थापनेची चर्चा सुरु असल्याचे कळते. सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत निर्णय जलद गतीने घ्या, अशी आग्रही मागणी शिवसेनेने काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या दिल्लीत कांग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला आघाडीतील मित्रपक्षांचे प्रतिनिधी देखील उपस्थित असतील, अशी माहिती मिळत आहे. उद्या होत असलेल्या बैठकीत शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, राष्ट्रवादीची इच्छा

उद्धव ठाकरे यांनी सरकारचे नेतृत्व करावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही मागणी असल्याची माहिती मिळत आहे. उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक पार पडल्यानंतर सर्व नेते मुंबईत परतणार आहेत. तसेच संजय राऊत सुद्धा उद्या मुंबईत परतण्याची शक्यता आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आधारकार्ड, ओळखपत्रासहीत आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश शिवसेनेकडून देण्यात आले आहेत.

First Published on: November 19, 2019 8:26 PM
Exit mobile version