शरद पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, ‘पवारांची भूमिका योग्यच’!

शरद पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, ‘पवारांची भूमिका योग्यच’!

Thackeray Group leader Sanjay Raut criticised Sharad pawar Rohit pawar

‘शिवसेनेसोबत महाआघाडीची कोणतीही चर्चा सुरू नसून सोनिया गांधींची सोमवारी घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती’, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत घेतलेल्या पत्राकार परिषदेत केलं. या वक्तव्यावरून नक्की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात नक्की काय गोंधळ सुरू आहे? असा प्रश्न राजकीय विश्लेषकांसोबतच मतदारांना देखील पडला. त्यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मध्यंतरी राज्यात भाजपचे काही लोक म्हणत होते की नरेंद्र मोदींना समजून घ्यायला संजय राऊतांना २५ जन्म लागतील. पण शरद पवारांना समजून घ्यायला त्यांना १०० जन्म लागतील’, असं संजय राऊत म्हणाले. दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली.

‘शरद पवारांची भूमिका योग्यच!’

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी ‘शरद पवारांची भूमिका योग्यच आहे’, असं मत व्यक्त केलं. ‘शरद पवारांचा अनुभव मोठा आहे. त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षातच बसण्याचा जनादेश मिळाला आहे. पण राजकारणात अशा गोष्टी घडतच असतात’, असं सूचक वक्तव्य यावेळी संजय राऊतांनी केलं.

‘मेंदूत गोंधळ असणाऱ्यांना गोंधळ दिसतो’

‘महाराष्ट्रात स्थिर सरकार येऊ नये, असं ज्यांनी ठरवलंय त्यांना हा गोंधळ वाटत असेल. माध्यमांमध्येच असा गोंधळ आहे. शिवसेनेकडे असा कोणताही पेच नाही. महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार बनेल. ज्यांच्या मेंदूत गोंधळ आहे, त्यांनी गोंधळ घालत बसावं. २०१४ साली देखील भाजप-शिवसेनेचं सरकार स्थापन करायला १५ दिवस लागले होते. १९९९मध्ये देखील १ महिना लागला होता. काश्मीरमध्ये देखील ५ महिने लागले होते’, असं देखील राऊत यावेळी म्हणाले.


हेही वाचा – तुमची उलटी गिनती सुरू, हिंमत असेल तर या अंगावर-उद्धव ठाकरे

‘भाजपला किंमत भोगावी लागेल’

दरम्यान, ‘२०१४मध्ये शिवसेनेला युतीमध्ये जायचं नव्हतं. पण भाजपनं आम्हाला युतीत घेतलं. पण आता भाजपनं त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. त्याची किंमत भाजपला येत्या काळात भोगावी लागेल’, असं देखील राऊत यावेळी म्हणाले.

First Published on: November 19, 2019 10:22 AM
Exit mobile version