घरमुंबईतुमची उलटी गिनती सुरू, हिंमत असेल तर या अंगावर - उद्धव ठाकरे

तुमची उलटी गिनती सुरू, हिंमत असेल तर या अंगावर – उद्धव ठाकरे

Subscribe

शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याचा तीव्र संताप उद्धव ठाकरेंनी आज 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून गेल्या काही दिवसांपासून मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या मोठा वाद पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदावरून या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता शिवसेनेने म्हणजे अर्थात उद्धव ठाकरेंनीच ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशीच दिल्लीमध्ये भाजपने शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यावर आता शिवसेनेकडून ‘सामना’मधून तोंडसुख घेतलं जात आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचा महाराष्ट्र अशा मंबाजींना साथ देणार नाही. मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरू झाली आहे. आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच गर्जना घुमेल, शिवसेना झिंदाबाद! हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार आहोत’, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सामनामधून भाजपला थेट आव्हान दिलं आहे. ‘आम्हाला एनडीएतून काढणारे तुम्ही कोण?’ असा सवाल यात विचारण्यात आला आहे.

‘त्या वाकडतोंड्याला एनडीए माहीत नाही’

शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याची घोषणा करणाऱ्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर अग्रलेखात खरपूस टीका करण्यात आली आहे. ‘दिल्लीच्या मंत्रीमंडळातल्या कुणी प्रल्हाद जोशींनी शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याचं जाहीर केलं. ज्या वाकडतोंड्याने ही घोषणा केली, त्याला शिवसेनेचं मर्म आणि एनडीएचे कर्म-धर्म माहीत नाहीत. तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या घुगऱ्या शिवसेनेनं खाल्ल्या आहेत’, असं अग्रलेखात म्हटलं आहे. ‘शिवसेनेला बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांनी इतिहास समजून घ्यायला हवा. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, पंजाबचे बादल अशा दिग्गजांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाया घातला, तेव्हा आजचे दिल्लीश्वर गोधडीत रांगतसुद्धा नसावेत. काहींचा तर जन्मही झाला नसावा’, असा टोला देखील अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

- Advertisement -

‘महाराष्ट्र एक तर उठत नाही, उठला की बसत नाही!’

दरम्यान, भाजपने एनडीए पद्धतशीरपणे नष्ट केली असा आरोपच अग्रलेखात करण्यात आला आहे. ‘कोणत्या आधारावर शिवसेनेला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला? घटकपक्षांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे का? या कृतीतून तुमच्या विचारांचे गजकर्ण बाहेर पडले. खोटेपणाची खाजवाखाजव सुरू होती. ज्या एनडीएचं अस्तित्वच साडेपाच वर्षात नष्ट केलं, त्या एनडीएतून म्हणे शिवसेनेला बाहेर काढलं. अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरुवात आहे. महाराष्ट्राशी घेतलेला पंगा तुमचा तंबू उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र एकतर उठत नाही आणि उठला की बसत नाही’, असं यात म्हटलं आहे.


हेही वाचा – ‘कभी कभी लगता है अपुनही भगवान है’; राऊत संसदेत बरसले!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -