नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर चार शहरांमधून शिवसेना हद्दपार!

नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर चार शहरांमधून शिवसेना हद्दपार!

शिवसेनेच्या औरंगाबाद सभेचा टीझर प्रसिद्ध, औरंगाबाद नाही, संभाजीनगर...

शिवसेना हा शहरी तोंडवळा असलेला पक्ष असून मातोश्रीची ताकद शहरांपुरती मर्यादित होत चालली आहे. पुंजक्या पुंजक्याने ग्रामीण भागातील वर्चस्वाचे काही अपवाद वगळता शिवसेना फार वाढत नसताना विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीवर नजर टाकली असता राज्यातील चार शहरांमधून शिवसेना हद्दपार झाल्याचे दिसत आहे. नवी मुंबई, नाशिक, पुणे आणि नागपूर या चार शहरांमध्ये युतीत एकही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली नाही. भविष्याचा विचार करता शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा असून या चारही महानगरपालिकांच्या सत्तेतही शिवसेनेला भाजप पुढे येऊ देणार नाही, हे आता नक्की झाले आहे. नवी मुंबईत ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही जागा भाजपकडे गेल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या गणेश नाईक (आधी त्यांच्या मुलाला संदीप नाईक यांना ही जागा जाहीर झाली होती ) यांना ऐरोलीमधून, तर मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून उमेदवारी मिळाली आहे. पुण्यात ८ पैकी एकही जागा सेनेला मिळालेली नाही. पुणे कॅन्टोमेंट-सुनील कांबळे, पुणे पर्वती- माधुरी मिसाळ, कसबा पेठ- मुक्ता टिळक, भोसरी- महेश लांडगे, वडगाव शेरी- जगदीश मुळीक, शिवाजी नगर- सिद्धार्थ शिरोळे, खडकवासला- भीमराव तापकीर, हडपसर- योगेश टिळेकर या सर्व जागा भाजपला गेल्या आहेत.

नाशिकमध्ये तिन्ही जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. नाशिक मध्य- देवयानी फरांदे, पश्चिम नाशिक -सीमा हिरे, तर चांदवड देवळा- डॉ. राहुल आहेर या मागच्याच आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात सहापैकी एकही जागा शिवसेनेला मिळालेली नाही. नागपूर दक्षिण पश्चिम- देवेंद्र फडणवीस, नागपूर मध्य- विकास कुंभारे, नागपूर पश्चिम- सुधाकर देशमुख, नागपूर उत्तर- मिलिंद माने, नागपूर दक्षिण- मोहन मते, नागपूर पूर्व- कृष्णा खाडे हे भाजपचेच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील.

मुंबईत २०१४ च्या निवडणुकीत ३६ पैकी भाजपने १५ जागा मिळवत शिवसेनेला मोठा हादरा दिला होता. शिवसेनेच्या वाट्याला फक्त १४ जागा आल्या होत्या. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धडक मारताना भाजपने आधी विधानसभा क्षेत्र मजबूत करताना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तोंडाला फेस आणला होता. फक्त दोन जागेच्या फरकाने म्हणजे सेना ८४ आणि भाजप ८२ अशी शिवसेनेला सत्ता मिळाली होती.

शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिकेत असल्याने तोच नाहीसा करायचा हे भाजपचे डावपेच सफल होत होते. पण, भाजपने त्यांना ढील दिली. मात्र २०२२ च्या निवडणुकीत तसे होणार नाही आणि राज्यातील इतर प्रमुख शहरांप्रमाणे मुंबई महापालिकेवर भाजपचीच सत्ता असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईत विजय नहाटा, विजय चौगुले असे नेते असताना या दोघांपैकी एकालाही विधानसभेची उमेदवारी मिळणार नसेल तर सेनेचा पाया कमकुवत करण्यासारखा आहे आणि हेच शिवसैनिकांच्या नाराजीतून दिसून आले आहे. यामुळे घाबरून बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तातडीने मातोश्रीवर जाऊन बंडखोर शिवसैनिकांना शांत करा, अशी विनवणी केली.

हीच बाब नाशिकमध्ये दिसून आली आहे. युतीत तीनपैकी एक जागा तरी शिवसेनेला मिळायला हवी होती, अशी तेथील शिवसेनेची मागणी होती. पण, २२ नगरसेवक असूनही एकही जागा मिळाली नसल्याने हे सारे नगरसेवक संतप्त झाले आहेत. या सर्वांच्या देहबोलीतून बंडखोरी समोर येत होती.

पुणे येथे शिवसेनेचे अस्तित्व अजूनही कायम आहे. मात्र ८ पैकी ८ जागा भाजपच्या वाट्याला जाणार असतील तर भविष्यात शिवसेना कशी उभारी घेणार असा तेथील शिवसैनिकांचा सवाल आहे. पक्षाचा पाया असूनही पुण्यातील नेते आणि पदाधिकारी पदाधिकारी भाजपच्या दावणीला बांधले गेल्याने या प्रमुख शहरात शिवसेनेची अवस्था नाजूक होत वाचली आहे, असे शिवसैनिकांचे मत आहे. नागपुरात शिवसेनेची मोठी ताकद नसली तरी ती वाढावी यासाठी ठरवून कधी प्रयत्न झाले नाहीत. संपर्कप्रमुखांच्या जीवावर शिवसेना वाढेल, यावर मातोश्री मग्न राहिल्याने त्याचा मोठा फटका पक्षाला बसला आहे. सहापैकी एकही जागा शिवसेनेला मिळालेली नसल्याने त्याचा मोठा परिणाम भविष्यात होणार आहे.

First Published on: October 3, 2019 6:14 AM
Exit mobile version