आमच्यासमोर शिवसेनेचा कोणताही प्रस्ताव नाही – शरद पवार

आमच्यासमोर शिवसेनेचा कोणताही प्रस्ताव नाही – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला कधीही पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार नाही. त्यामुळे अयोध्या निकालापूर्वी तरी भाजप-शिवसेनेने राज्यात सुरु असलेल्या सत्ता स्थापनेचा पोरखेळ थांबवावा’, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारली. त्याचबरोबर सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचा खुलासा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला कधीही पाठींबा देण्याबाबत निर्णय घेणार नाही, असे स्पष्टीकरणही पवार यांनी दिल्याने राज्यातील सत्तास्थापनेबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. पवार यांनी आज नाशिक जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ‘न्यूज१८लोकमत’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – शिवसेनेला मोठा धक्का; ५ नोव्हेंबरला भाजप मंत्र्यांचा शपथविधी सोहळा!

‘संजय राऊत यांच्याशी राजकीय चर्चा झाली नाही’

भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या समान वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेनेही मुख्यमंत्री आमचाच असा दावा केला आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची बातमी प्रसारमाध्यांवर झळकली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देवून सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधान आले. मात्र संजय राऊत यांच्याशी आपली कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. यावेळी पवार म्हणाले, ‘सरकार बनवायचे असेल तर भाजपला आज ना उद्या नमते घ्यावेच लागेल. कारण कितीही अपक्ष उमेदवारांना हाताशी धरले तरी सरकार बनवण्यासाठी आवश्यक बहुमत त्यांच्याकडे नाही. हे पाहता भाजपला शिवसेनेच्या मागण्या मान्य कराव्या लागतील.’

हेही वाचा – राज्यातील सत्ता घालवू नका; दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर वाढला दबाव

आम्ही विरोधातच बसणार – शरद पवार

‘आम्ही विरोधातच बसणार’, असे पुन्हा एकदा शरद पवार यावेळी म्हणाले. पण शिवसेना आणि भाजपने हा पोरखेळ लवकरात लवकर थांबवून ९ नोव्हेंबरपूर्वी नवे सरकार स्थिर असणे आवश्यक आहे, असेही पवार म्हणाले. ‘९ नोव्हेंबरला अयोध्येचा निकाल आहे. अयोध्या प्रकरणात यापूर्वी मुंबईत आणि महाराष्ट्रात काय झाले आहे? आपण पाहिले आहे. समाजातल्या सगळ्या घटकांमध्ये शांतता राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकार तिथे असणे, त्यांनी विश्वास देण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे’, असेही ते म्हणाले.

First Published on: November 1, 2019 5:38 PM
Exit mobile version