कल्याणमध्ये शिवसेनेचा भाजपाविरोधात बंडखोरीचा आवाज!

कल्याणमध्ये शिवसेनेचा भाजपाविरोधात बंडखोरीचा आवाज!

स्थायी समितीच्या बैठकीवरून पुन्हा भाजपकडून शिवसेना टार्गेट

कल्याण पूर्व व पश्चिम या दोन्ही जागेवर भाजपाकडे असून या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. शिवसेनेला या जागा न सोडल्यास भाजप विरोधात बंडखोरी करण्याचा इशारा आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. सेनेतील सर्व इच्छूकांची शहर शाखेत बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी भाजपा विरोधात लढण्याची घोषणा केली. त्यामुळे कल्याणमध्ये भाजपा विरूध्द शिवसेना असा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे युती होण्याआधीच शिवसेनेने भाजपा विरोधात बंडाचा आवाज दिला आहे, अशीच सर्वत्र चर्चा आहे.

म्हणून शिवसेनेने मतदार संघावर दावा केला

कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व असे दोन विधानसभा मतदार संघ आहेत. २०१४ च्या निवडणुकीत कल्याण पश्चिमेतून भाजपाचे नरेंद्र पवार हे निवडून आले आहेत. तर कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड हे अपक्ष आमदार निवडून आले आहेत. काही दिवसांपूर्वीच गायकवाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघ भाजपाच्या ताब्यात गेली आहेत. मागील निवडणुकीत कल्याण पश्चिमेतून सेनेचे विजय साळवी हे अवघ्या २ हजार २०० मतांनी तर कल्याण पूर्वेतून सेनेचे गोपाळ लांडगे हे ७४५ मतांनी पराभूत झाले होते. दोन्ही मतदार संघातून शिवसेनेचा निसटता पराभव झाल्याने, हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, कल्याणमधून शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेने या दोन्ही मतदार संघावर दावा केला आहे.

शिवसेना बंडखोरी करणार

कल्याण पश्चिमेत शिवसेनेतून ११ तर पूर्वेतून ५ जण इच्छूक आहेत. आज कल्याणच्या शहर शाखेत सर्व इच्छूकांची व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. भाजपाने हे दोन्ही मतदार संघ शिवसेनेला सोडले नाही. भाजपा विरोधात बंडखोरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या दिवशी शिवसेनेतील एक इच्छूक उमेदवारी अर्ज सादर करणार आहे, असे शहर प्रमुख भोईर यांनी सांगितले. शिवसेना भाजप युती बाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र त्या अगोदरच शिवसेनेने भाजपा विरोधात बंडाचा आवाज दिला आहे. त्यामुळे भाजपा या दोन जागा शिवसेनेला सोडणार का? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

First Published on: September 29, 2019 7:09 PM
Exit mobile version