पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात वृक्षांची कत्तल? काय आहे सत्य?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात वृक्षांची कत्तल? काय आहे सत्य?

पंतप्रधान नरेंद्र मोदी

एकीकडे मुंबईतल्या आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केल्यामुळे सरकारवर टीका केली जात असतानाच आता पुण्याच्या एसपी कॉलेजच्या मैदानातली झाडं कापल्याचं प्रकरण समोर आलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठीच ही झाडं कापली गेल्याचं आता बोललं जात आहे. येत्या १७ ऑक्टोबरला एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा होणार आहे. पुण्यातल्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, सभेआधीच झाडं तोडली गेल्यामुळे ती चर्चेत आली आहे. सप महाविद्यालयाच्या मैदानातील एकूण पंधरा ते वीस झाडे कापण्यात आली आहे. संबंधित संस्थेने झाडे तोडण्याची परवानगी घेतली होती, असा दावा भाजपने केला आहे. याप्रकरणी विरोधी पक्षाने तीव्र निषेध व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे.

पर्यावरण प्रेमींचा संताप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या कालावधीत पुणे शहरातील अनेक रस्त्यांवरील झाडे फांद्या छाटण्यात आल्या होत्या. त्यावेळी देखील पर्यावरणप्रेमींकडून तीव्र भावना व्यक्त केल्या गेल्या होत्या. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील याचे पडसाद उमटले होते. तेव्हा महापालिका प्रशासनाने चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल, असं सांगितले होते. ही घटना ताजी असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी असलेली १५ ते २० झाडे कापण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केलेला आहे.


हेही वाचा – आरे जंगल वाचवणारच-तेजस ठाकरे

झाडं नव्हे, फांद्याच तोडल्या?

दरम्यान, मोदींची सभा एसपी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. सभेच्या व्यासपीठाच्या मागील बाजूला असलेली ही झाडं सोमवारी कापली गेली. सदर मैदान हे शिक्षण प्रसारक मंडळाचे आहे. ही झाडे कापण्यासाठी संस्थेने महापालिका प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. प्रशासनाच्या परवानगीनुसारच झाडे कापण्यात आल्याचा दावा भाजपच्या शहराध्यक्ष आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे येथील काही झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. त्या फांद्या काढण्यात आल्या असंही मिसाळ यांनी सांगितलं.

पालिका प्रशासन काय करणार?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अॅड. वंदना चव्हाण यांनी हा प्रकार धक्कादायक असल्याचे नमूद केले. यापूर्वी महाजनादेश यात्रेच्या वेळी ही झाडे कापली गेली होती. त्याप्रकरणी देखील प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. आता महापालिका प्रशासन काय करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. एकीकडे वृक्ष लागवड केली असे सांगणारे सत्ताधारी अशा प्रकारे वृक्षतोड करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसचे मोहन जोशी यांनी देखील याप्रकरणी आयुक्तांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली असल्याचे सांगितले.

First Published on: October 15, 2019 7:30 PM
Exit mobile version