काँग्रेस-राष्ट्रवादी भविष्यात विलीन होऊ शकतात – सुशीलकुमार शिंदे

काँग्रेस-राष्ट्रवादी भविष्यात विलीन होऊ शकतात – सुशीलकुमार शिंदे

राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात एकत्र येऊ शकतात, दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होऊ शकतं’, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून अनेक नवीन तर्क लढवले जाऊ लागले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, हे विलीनीकरण नक्की कधी होणार? याविषयी सुशीलकुमार शिंदे यांनी काहीही सांगितलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सुशीलकुमार शिंदे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.

काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे बोलत होते. ते म्हणाले, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी भविष्यात एकत्र होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं, त्याची आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल, तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील. सध्याच्या वातावरणात काँग्रेसही थकली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील थकली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एक होऊ शकतात, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते.’

दरम्यान, सुशीलकुमार शिंदेंच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे.

First Published on: October 8, 2019 4:15 PM
Exit mobile version