Thursday, May 16, 2024
घरमानिनीReligiousवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

अहा कटकटा हें वोखटें । इयें मृत्युलोकींचें उफराटें । एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥
अरे अरे, अंगावर काटा येतो! ज्या मृत्युलोकाचा व्यवहार अगदी उलटा असून वाईट आहे म्हणून किती सांगावे! अर्जुना अशा मृत्युलोकात तू अकल्पित जन्म पावला आहेस. किती ही वाईट गोष्ट! या मृत्युलोकी सर्वच गोष्टी उलट्या घडतात! तर अर्जुना, तू जरी येथे यदृच्छेने जन्मला आहेस.
तरि झडझडोनि वाहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥
तर पटकन अंग झाडून वेगळा हो आणि ज्या योगाने माझ्या अविनाशी पदाला प्राप्त होशील, त्या भक्तिमार्गाला लवकर लाग.
तूं मन हें मीचि करीं । माझिया भजनीं प्रेम धरीं । सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ॥
तू आपले मन मद्रूपी करून माझे भजन करण्याविषयी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी मीच आहे असे समजून नमस्कार कर.
माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख । मद्याजी चोख । याचि नांव ॥
हे पाहा, मनातील सर्व संकल्प नाहीसे करून जो माझ्याकडे लक्ष ठेवितो, तोच माझे यजन करणारा असे नाव पावतो.
ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरूपा पावसी । हे अंतःकरणींचें तुजपासीं । बोलिजत असें ॥
असा माझ्या योगाने संपन्न होशील त्याच वेळेस माझ्या स्वरूपाला पावशील. ही माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट मी तुला सांगितली आहे.
अगा अवघिया चौरिया आपुलें । जें सर्वस्व आम्हीं असे ठेविलें । तें पावोनि सुख संचलें । होऊनि ठासी ॥
अरे, सर्वापासून लपवून ठेविलेली अशी आमची गुप्त गोष्ट ती प्राप्त करून घेऊन सुखरूप होऊन राहशील.
ऐसें सांवळेनि परब्रह्में । भक्तकामकल्पदुमें । बोलिलें आत्मारामें । संजयो म्हणे ॥
संजय म्हणतो, ‘श्यामवर्ण परमात्मा व भक्तांची इच्छा पूर्ण करणारे कल्पवृक्ष श्रीकृष्ण, ते याप्रमाणे बोलले.’

- Advertisment -

Manini