मुरुडमध्ये माशांऐवजी जेलीफिश जाळ्यात, ५०० नौकांची मासेमारी ठप्प

मुरुडमध्ये माशांऐवजी जेलीफिश जाळ्यात, ५०० नौकांची मासेमारी ठप्प

मुरुडमध्ये मास्यांऐवजी जेलीफिश जाळ्यात ; ५०० नौकांची मासेमारी ठप्प

ऐन मासेमारीच्या हंगामात मुरुड तालुक्यात तब्बल ५०० नौकांची मासेमारी ठप्प झाली आहे. दसऱ्यानंतर अचानक समद्र किनाऱ्यावर अत्यंत दाहक असणारी जेलीफिश आढळून आली. त्यामुळे मासेमारी हंगामामध्ये मुरूड तालुक्यातील राजपुरी, एकदरा, मजगाव, नांदगाव, मुरूड तर श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, आदगाव, हरवीत, कुडगाव म्हसळा तालुक्यातील वाशी हवेली, तुरबाडी आदी बंदरातून मासेमारीस जाणार्‍या सुमारे ५०० नौकांची मासेमारी ठप्प झाल्याची माहिती राजपुरी येथील ज्येष्ठ मच्छीमार आणि होलसेल मासळी व्यवसायिक धनंजय गिदी यांनी दिली.

मच्छिमार मासेमारीसाठी गेले असता, त्यावेळी जेलिफिश जाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळाली आणि या जेलिफिशचा स्पर्श झाल्यास १५ ते २० तास दाह कमी न होता खाज सुटत राहते. डोळ्यांना स्पर्श झाल्यास डोळे लाल आणि मोठा दाह होत आहे. परिणामी समुद्रात मिळणारी अन्य मासळीदेखील जेलीफिशपासून खूप दूर निघून जाते. जे मच्छीमार मासेमारीस गेले होते ते बहुतेक सर्वजण मासेमारी किनार्‍याकडे तातडीने परतले आहेत.परतलेल्या १० छोट्या-मोठ्या गावातील सुमारे ५०० नौकांचा समावेश आहे. जेलिफिशचे आक्रमण धोकादायक असून, ते किती दिवस राहील याचा नेम नसतो, अशी माहिती मच्छीमारांनी दिली. जेली फिशला कोळी भाषेत ‘आग्या मासळी’ असे म्हटले जाते. ही मासळी कोणी खात नाही.

जेलिफिशचे आरिष्ट

कोळंबी आणि मोठ्या मासळीच्या ऐन हंगामामध्ये जेलिफिशचे अरिष्ट आल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या संकटामुळे ताजी मासळी फारशी दिसून येत नसून, बाहेरगावची आयात मासळी दिसत आहेत. समुद्रातील मानवी प्रदूषण, पर्सनीन मासेमारी, आदी समस्या पारंपरिक मच्छिमारांपुढे आहेतच. अशातूनच मासेमारी करायची म्हणजे नुकसान आणि मोठे आव्हानच उभे ठाकले आहे.

‘या’ अडचणीमुळे मासेमारी सतत ठप्प होत होती.

1 ऑगस्टपासून मासेमारीस सुरुवात झाली असली तरी अतिवृष्टी, वादळी वारे आणि विविध अडचणीमुळे मासेमारी सतत ठप्प होत होती. त्यामुळे मच्छिमारांना मोठी मासेमारी करण्यास संधीच मिळाली नाही. करोडो रुपयांचा डिझेल परतावा महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे. डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मच्छिमारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने मच्छिमारांच्या प्रलंबित समस्या सोडविणे ही काळाची गरज बनली आहे.

                                                                                 वार्ताहर – अमूलकुमार जैन


हे ही वाचा – गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपाईन्स मध्ये अटक?


 

First Published on: October 20, 2021 7:58 PM
Exit mobile version