दोन दिवसीय अधिवेशन व्यवस्थेला अभिप्रेत नाही

दोन दिवसीय अधिवेशन व्यवस्थेला अभिप्रेत नाही

कोरोनाच्या संकटाच्या निमित्ताने विधिमंडळाचे अधिवेशन सतत दोन दिवसांचे घेणे व्यवस्थेला अभिप्रेत नाही, असे मत नोंदवत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षांच्या सुरात सूर मिळवला. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर अशा दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही दोन दिवसांचे अधिवेशन आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले आहे.

नाना पटोले शुक्रवारी पंढरपूरमध्ये होते.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देशभर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या आगमनामुळे हे अधिवेशन सात दिवस पुढे ढकलून ते १४ आणि १५ डिसेंबरला बोलवण्यात आले आहे. कोरोनाच्याच कारणास्तव मुंबईत पार पडलेले पावसाळी अधिवेशनही दोन दिवसात उरकण्यात आले.

सतत दुसरे अधिवेशनही दोन दिवसात उरकण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी टीका केली असताना विधानसभा अध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अधिवेशनाचा वेळ कमी केल्याचे आपल्याला मान्य नसल्याचे नाना पटोले म्हणाले. समस्येवर मात करण्यासाठी अधिवेशन मुंबईत होत असताना विधानसभेचे कामकाज दोन दिवसात उरकणे व्यवस्थेला आव्हानच असल्याचे नाना म्हणाले.

कोरोनामुळे सभागृहात गर्दी होऊ नये यासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीने अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा निश्चित केला असल्याचे ते म्हणाले. आमदारांना आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याचे स्वातंत्र्य अधिवेशनात आहे. त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागतात. कालावधी कमी असल्याने आमदारांवरही मर्यादा येणार आहेत. यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करणे लोकशाहीला पोषक नाही, असेही म्हणाले.

विधिमंडळाचे अधिवेशन चांगल्या पद्धतीने पार पडावे यासाठी नियमावली तयार करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. कठीण परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातून कामकाज करता येईल का? याबाबतची चाचपणी सुरू असल्याची माहिती पटोले यांनी यावेळी दिली.

First Published on: December 5, 2020 6:21 AM
Exit mobile version