जळगावातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून अंबादास दानवेंचा सरकारला संतप्त सवाल

जळगावातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून अंबादास दानवेंचा सरकारला संतप्त सवाल

यवतमाळ जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्ज योजना व प्रोत्साहन भत्ता प्रलंबित प्रकरणी आज गुरूवारी (ता. 23 मार्च) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली. अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याची सरकार वाट बघणार? असा संतप्त सवाल करत त्यांनी सरकारला फैलावर घेतले.

यवतमाळ जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्ज योजनेत बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही. 2017 पासून म्हणजेच गेल्या 7 वर्षात या जिल्ह्यात 23 ग्रीन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यात 3 लाख 59 हजार 298 पात्र शेतकरी होते. यातील 2 लाख 30 हजार 834 शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत कर्जमाफी मिळाली. याचाच अर्थ 2017 च्या योजनेत अजूनही 1 लाख 28 हजार 464 शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे बाकी आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, सर्वात जास्त आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार 464 शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे. गेल्या तीन महिन्यात 90 शेतकऱ्यांनी या जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व प्रोत्साहन भत्ता अनुदान शेतकऱ्यांना कधी देणार? अजून किती शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचे सरकार वाट बघणार? तसेच ज्यांची कर्जमाफी झाली नाही त्यांना कधीपर्यंत कर्जमाफी देणार असा सवाल दानवे यांनी सरकारला विचारला.

तसेच पूर्ण राज्याचा आढावा घेऊन पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ सरकार देणार का? असा सवाल देखील दानवे यांनी यावेळी उपस्थित केला. तर गेल्या दीड वर्षांपासून पोर्टल बंद होते, ते सुरू करण्याचे काम सुरू असून लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करू असे उत्तर सरकारच्या बाजूने मंत्री अतुल सावे यांच्याकडून देण्यात आले.

दरम्यान, यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्ज योजनेच्या मार्फत अद्यापही कर्जमाफी देण्यात आलेली नसल्याच्या वृत्ताला सरकारकडून देखील दुजोरा देण्यात आलेला आहे.


हेही वाचा – तुम्ही झाडामध्ये जळणारे द्रव्य टाकले, युतीवरून सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

First Published on: March 23, 2023 3:49 PM
Exit mobile version