राज्यपालांचे भाषण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा वेध घेणारे; भाजप गटनेते प्रविण दरेकर यांचे प्रतिपादन

राज्यपालांचे भाषण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा वेध घेणारे; भाजप गटनेते प्रविण दरेकर यांचे प्रतिपादन

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणावर आज (ता. १ मार्च) विधानपरिषदेत भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आभार प्रस्तावपर भाषण केले. राज्यपालांचे भाषण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासाचा वेध घेणारे आहे, असे प्रतिपादन यावेळी प्रविण दरेकर यांनी केले. तसेच यावेळी दरेकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारने सात महिन्यांत केलेल्या उल्लेखनीय कामांचा लेखाजोखा मांडला.

विधानपरिषदेत बोलताना आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारने भविष्यात काय करावे त्याची दिशा स्पष्ट होत असते. सरकारच्या कालावधीत एकंदर सरकारचा कारभार कशा पद्धतीने चालतो याचा प्रतिबिंब राज्यपालांच्या भाषणात असतो. या राज्यपालांच्या अभिभाषणात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा पूर्णपणे विचार झाल्याचे दिसत आहे. पूर्वीचे सरकार असताना केंद्र व राज्य सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नव्हता. ते अहंकारात बुडलेले सरकार होते. त्यामुळे केंद्राच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असल्या तर त्यासाठी राज्य सरकारने जे काही अंशदान द्यायचे असते ते दुर्दैवाने दिले गेले नाही. राज्याचा विकास महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात झाल्याचे दिसून आले नाही. राज्यपालांच्या अभिभाषणात पाहिले तर प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजना, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना व प्रधानमंत्री श्रीशाळा योजना यांचा उल्लेख आहे. सरकार बदलल्यानंतर केंद्राच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आणण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारने केले हे विशेष असल्याचेही दरेकर यावेळी म्हणाले.

मराठीच्या नावावर सातत्याने ज्यांनी काम केले. त्यांच्या काळात मराठी भाषेच्या संवर्धनसाठी, उत्कर्षासाठी नेमके काय केले. अडीच वर्षाच्या काळात कुठल्याही प्रकारचे भरीव काम झालेले नाही. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मराठी भाषा भवन मार्गी लागत असल्याचे दिसून येत आहे. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी, संवर्धनासाठी काम करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही प्रविण दरेकर यांनी सांगितले. तसेच सीमावासियांच्या प्रश्नासंदर्भात बोलले जाते. विषय वारंवार पुढे येतात. पण कधीच कुठल्या सरकारने सीमाभागातील लोकांसाठी भरीव अशी मदत केली नव्हती. महाराष्ट्रात ज्या योजना लागू आहेत त्या योजना तशाच्यातशा सीमाभागातील मराठी भाषिकांना लागू करण्याचा निर्णयही शिंदे-फडणवीस सरकारने घेतल्याचे दरेकर यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

प्रविण दरेकर पुढे म्हणाले की, कोरोनानंतर आपली अर्थव्यवस्था पुनर्जिवीत करण्याचे कामही राज्य सरकारने केले आहे. एमएसएमईच्या माध्यमातून केंद्राच्या योजना आहेत, त्या योजना लागू करत येथील उद्योग व्यवसायालाही हातभार देण्याचे काम केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या माध्यमातून झाले आहे. कोरोनाकाळात कंत्राटी पद्धतीने ज्या आरोग्य सेवा दिल्या गेल्या त्या ठिकाणचे वैद्यकीय सहाय्यक असतील, आशा अंगणवाडी कर्मचारी असतील त्यांचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीवेळी गुणांकन करण्याचा महत्वाचा निर्णयही शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. तसेच मराठा समाजासाठी ज्या योजना द्यायच्या आहेत त्याच्या त्रुटी काय आहेत, त्या कशा पद्धतीने मार्गी लावल्या पाहिजेत यावर अत्यंत बारकाईने लक्ष घालून चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून त्या त्रुटी सोडवण्यात आल्या आहेत. जे मराठा उमेदवार न्यायालयाच्या निर्णयामुळे बाधित होते, अशा १५५३ अधिसंख्य पदांची निर्मिती करण्यासाठी विशेष कायदा बनविण्याचे काम याच सरकारच्या माध्यमातून करण्यात आले. मराठा समाजा संदर्भात अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ आहे. त्याच्या निधीत वाढ करण्याचे काम करण्यात आले. भांडवली गुंतवणूकसाठी २०२२-२३ करिता केंद्राकडून राज्याला विशेष सहाय्य म्हणून ८ हजार कोटी मिळाले आहेत. त्यातील ५ हजार ८४ कोटी याआधीच मंजूर झाले आहेत.

अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक आली नाही. केवळ आम्ही दावोसला गुंतवणूकीला गेलो. उद्योगधंदे आणण्यासाठी गेलो. किती उद्योगधंदे आले, चालू झाले याचा जर लेखाजोखा घेतला तर कुठल्याही प्रकारचा उद्योग किंवा गुंतवणूक मागील सरकारच्या काळात आली नाही. परंतु दावोसला जानेवारी २०२३ मध्ये १९ कंपन्याची परिषद झाली. साधारणतः १ लाख ३७ हजार कोटी रुपये इतकी गुंतवणूक झाली. महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, सांगली, अकोला, हिंगोली, रायगड, रत्नागिरी, भिवंडी आणि पुणे या ठिकाणी ९ लॉजिस्टिक पार्क उभे करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. अशा प्रकारचा विचार याआधी कधीच झाला नाही. सात-आठ महिन्याच्या काळात हे सरकार उद्योगाबाबतीत अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्ष घालत महाराष्ट्राला उद्योग धंद्यात पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे करत असताना रोजगार निर्मितीवरही भर दिला जात असल्याचे प्रविण दरेकर यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

तसेच केवळ गुंतवणूक करून शिंदे-फडणवीस सरकार थांबत नाही. तर सरकारच्या माध्यमातून गुंतवणूक होत असताना आवश्यक असणारी ट्रेनिंग सेंटरही उभी करत आहेत. महाराष्ट्र हे औद्योगिक प्रगतीत सर्वात पुढे असणारे राज्य आहे. देशाच्या आर्थिक जीडीपीमध्ये १४ टक्के वाटा आपला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करत आहेत. ५ ट्रिलियन डॉलरची इकोनॉमी करण्याचा त्यांचा मानस आहे. अशावेळेला महाराष्ट्राचेही योगदान असावे अशा प्रकारचा मानस शिंदे-फडणवीस सरकारचा असल्याचे दरेकर म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार अभिनंदनास पात्र
जी-२० च्या माध्यमातून देशाचे नाव जगाच्या पाठीवर रोषण झाले आहे. आपल्याला अध्यक्ष पदाचा मान मिळाला. मुंबई शहरात जी-२० चे अधिकारी ज्यावेळेला आले होते, त्यावेळी संपूर्ण मुंबईचा कायापालट झाल्याचे चित्र दिसले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना मुंबईसह राज्यभर लागू केली. अनेक तपासण्या या माध्यमातून करण्याचा मानस या सरकारचा आहे त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार अभिनंदनास पात्र आहे, अशी माहिती प्रविण दरेकर यांच्याकडून आभार प्रस्तावपर भाषणातून देण्यात आली.


हेही वाचा – अधिवेशन संपण्यापूर्वी विशेष अधिकार समितीने राऊतांवर कारवाई करावी – अतुल भातखळकर

First Published on: March 1, 2023 6:37 PM
Exit mobile version