Fisherman prisoner : पाक कैदेतील 199 भारतीय मच्छीमारांची 12 मे रोजी होणार सुटका

Fisherman prisoner : पाक कैदेतील 199 भारतीय मच्छीमारांची 12 मे रोजी होणार सुटका

इस्लामाबाद : एका भारतीय कैद्याचा तुरुंगात मृत्यू झाल्यानंतर कैदेतील अन्य 199 भारतीय मच्छिमारांची (Fisherman prisoner) सुटका करण्याच्या तयारीत पाकिस्तान सरकार (Pakistan government) आहे. सद्भावनेच्या हेतूने पाकिस्तान सरकार या भारतीय मच्छिमारांची तुरुंगातून सुटका करणार आहे. या कैद्यांना कराची तुरुंगातून लाहोरला पाठवण्यात येणार असून लाहोरहून हे कैदी वाघा बॉर्डरमार्गे मायदेशी परततील.

भारतीय कैद्यांच्या सुटकेचे आदेश संबंधित मंत्रालयाकडून आले आहेत. या कैद्यांची सुटका करून शुक्रवारी म्हणजेच 12 मे रोजी लाहोरला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती कराचीतील वरिष्ठ पोलीस अधिकारी काझी नजीर यांनी दिली. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेला भारतीय कैदी झुल्फिकारचा नुकताच रुग्णालयात मृत्यू झाला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे झुल्फिकारला कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे झुल्फिकारचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे.

पाकिस्तानी तुरुंगात कैद्यांच्या कल्याणासाठी काम करणारी पाकिस्तानी संस्था ईदी वेलफेअर ट्रस्ट ही या भारतीय कैद्यांना लाहोरला नेण्याची व्यवस्था करणार आहे. पाकिस्तानच्या तुरुंगातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि तेथे डॉक्टर तसेच उपचारांसाठी योग्य व्यवस्था नाही. परिणामी, कैदी आजारी पडतात आणि काही वेळा हे आजारपण त्यांच्या जीवावरही बेतते, असा आरोप या ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

शिक्षा पूर्ण होऊनही भारतीय कैदी तुरुंगातच
पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसीच्या मते, 654 भारतीय मच्छिमार पाकिस्तानमधील कराची येथील दोन तुरुंगात बंद आहेत. यापैकी बहुतांश मच्छीमार हे अशिक्षित आणि गरीब आहेत. ते अनावधानाने भारतातून पाकिस्तानच्या सागरीहद्दीत घुसतात. 83 पाकिस्तानी मच्छिमारही भारतीय तुरुंगात बंद आहेत. पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या 654 भारतीय कैद्यांपैकी 631 जणांनी आपली शिक्षा पूर्ण केली असून ते सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा – ‘पाहुणे चांगले असतील तर यजमानही…’; एस जयशंकर यांचा बिलावल भुत्तोंवर हल्ला

First Published on: May 8, 2023 5:25 PM
Exit mobile version