अलाहाबादचं नाव ‘प्रयाग’ करण्याची सिद्धार्थनाथ सिंहांची मागणी

अलाहाबादचं नाव ‘प्रयाग’ करण्याची सिद्धार्थनाथ सिंहांची मागणी

सिद्धार्थनाथ सिंह

उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी अलाहाबादचं नाव बदलून ‘प्रयाग’ करण्यात यावं अशी मागणी केली आहे. यासंदर्भात राज्यपाल राम नाईक यांना त्यांनी एक पत्र लिहिलं आहे. ‘बॉम्बे’चं नाव ‘मुंबई’ करण्यात राज्यपालांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळं या पत्रावर गंभीरतेनं विचार करण्यात येईल अशी मला आशा आहे.’ असं सिद्धार्थनाथ सिंह यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं.

‘प्रयाग’ नावाची तयारी आधीपासूनच

अलाहाबादमध्ये २०१९ मध्ये होणाऱ्या कुंभ आयोजनाच्या पूर्वीपासूनच अलाहाबादचं नाव बदलून ‘प्रयागराज’ करण्याची तयारी चालू असल्याची माहिती आहे. यासंदर्भात यापूर्वी उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनीदेखील आधी वक्तव्य केलं होतं. मे महिन्यात अलाहाबादमध्ये करण्यात आलेल्या दौऱ्यामध्ये अलाहाबादची ओळख ही तीन नद्यांमुळं मुख्यतः असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर यावेळी याचं नाव ‘प्रयागराज’ असायला हवं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. हेच नाही तर कुंभ आयोजनापूर्वी नाव बदलण्याचं आश्वासनदेखील यावेळी त्यांनी दिलं होतं.

पत्र ही पुढची पायरी

सिद्धार्थनाथ सिंह यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र ही या वक्तव्याच्या पुढची पायरी आहे असं म्हटलं जात आहे. तर, योगी सरकार यासंदर्भात लवकरच ‘अलाहाबाद’चं नाव ‘प्रयाग’ करण्यासाठी आदेश देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच यावर नक्की सरकार काय पावलं उचलेल आणि काय निर्णय घेईल हे कळेल.

भाजपाच्या राज्यात बदललेली नावं

भाजपा आणि एनडीएची २०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर काही नावं बदलण्यात आली, ज्यावरून बऱ्याच चर्चाही झाल्या. उत्तर प्रदेशच्या चांदुली जिल्ह्यातील मुघलसराई स्टेशनचं नाव बदलून पंडीत दीनदयाळ उपाध्याय जंक्शन करण्यात आलं. तर, दिल्लीतील औरंगजेब रोडला डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असं नाव देण्यात आलं आहे.

First Published on: July 9, 2018 8:03 PM
Exit mobile version