मॉस्कोतील हॉटेलमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण

मॉस्कोतील हॉटेलमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण

मॉस्को शहरातील ऐतिहासिक Sovetskiy हॉटेलमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मॉस्को शहरातील ऐतिहासिक Sovetskiy हॉटेलमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर १९६१ साली अण्णाभाऊ साठे यांनी ४० दिवस या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. रशियातील कष्टकरी, कामगार वर्गाचा अभ्यास करण्यासाठी रशियन सरकारने त्यांना आमंत्रित केले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर या हॉटेलमध्ये तैलचित्र लावण्यात आलेले अण्णाभाऊ हे दुसरे भारतीय ठरले आहेत. प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी याप्रसंगाचे फेसबुक लाईव्ह केल्यामुळे हा सोहळा आपल्याला फेसबुकवर पाहता येणार आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा –

हॉल ऑफ फेममध्ये अण्णाभाऊ साठे

हॉटेलमध्ये ज्या भागात हे तैलचित्र लावण्यात आलेले आहे. त्या जागेला हॉल ऑफ फेम म्हणतात. याठिकाणी रशिया आणि जगभरातील महत्त्वाच्या महापुरुषांची तैलचित्रे लावण्यात आलेली आहेत. यामध्ये वॉर अँड पीस या कांदबरीचे लेखक लियो टॉलस्टॉय, रशियाचे राज्यकर्ते लेनिन आणि स्टॅलिन यांची तैलचित्र लावण्यात आलेली आहेत. आता इंदिरा गांधी यांच्यानंतर अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र लावल्यामुळे भारतीयांसाठी हा मोठा बहुमान असल्याचे मानले जात आहे.

अण्णाभाऊ साठे यांनी रशियात जाऊन शिवाजी महाराज यांचा पोवाडा गायला होता. अण्णाभाऊ साठे यांनी ‘माझा रशियाचा प्रवास’ हे पुस्तक लिहून रशियातील अनेक प्रसंगांना शब्दबद्ध करुन ठेवलेले आहे. या ४० दिवसांत त्यांनी मॉस्कोत पायी भटकंती केली. हॉटेलमधील कर्मचारी, रशियातील फोटोग्राफर, ड्रायव्हर आणि इतर कामगारांसोबत संवाद साधत रशियातील कष्टकऱ्यांचे जीवन समजून घेतले होते. एमजीडी मिशन या संघनेने हे तैलचित्र लावण्याबाबत पुढाकार घेतला होता. याच संस्थेच्या माध्यमातून जवळपास ३५० भारतीय जगभरातून या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले होते. याच हॉटेलमध्ये त्यांनी लेनिनवरचा पोवाडा लिहिला होता. तसेच शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियात गाणारे ते पहिलेच लोकशाहीर होते.

First Published on: September 20, 2019 9:56 PM
Exit mobile version