अर्जुन पुरस्कार विजेते बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

अर्जुन पुरस्कार विजेते बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

अर्जुन पुरस्कार विजेते बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर

अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि १९६० च्या दशकांत भारतीय क्रीडा क्षेत्राला एका उंचीवर नेणारे नंदू नाटेकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले आहे. ते ८८ वर्षाचे होते. १९६१ मध्ये सुरु झालेला अर्जुन पुरस्कार पहिल्यांदा प्राप्त करण्याचा मान नंदू नाटेकर यांना मिळाला होता. भारताबाहेर विजेतेपद मिळवणारे नंदू नाटेकर पहिले बॅडमिंटन खेळाडू आहेत. त्यांनी १५ वर्षाच्या कारकिर्दीत १०० पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात १७ राष्ट्रीय विजेतेपदांचा समावेश आहे. ६ एकेरी, ६ दुहेरी, ५ मिश्र दुहेरी स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

नंदू नाटेकर यांच्याबद्दल…

नंदू नाटेकर हे मूळचे सांगलीचे होते. मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. बॅडमिंटन क्रिडाप्रकारात त्यांनी भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे ते पहिले बॅडमिंटनपटू ठरले असून भारत सरकारच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित होणारे ते पहिले क्रीडापटू होते. क्रिकेट, टेनिस या क्रिडाप्रकारांतही त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजवल्यात आणि त्या खेळात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदू नाटेकर यांनी आपल्या अद्भूत खेळाने भारतामध्ये बॅडमिंटन खेळाची दखल घ्यायला लावली होती. अफलातून सातत्यासाठी नाटेकर यांना ‘गोल्डन बॉय ऑफ इंडियन बॅडमिंटन’ अशी उपाधी देण्यात आली होती. नंदू नाटेकर म्हणजे बॅडमिंटनचं विद्यापीठच आहे. ६० च्या दशकात नाटेकर एकाचवेळी एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा तीन प्रकारामध्ये खेळत होते. ऑल इग्लंड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली होती. १९६० च्या दशकात जाहिरात क्षेत्रातही त्यांनी मोठी मजल मारली असून हेअर क्रीमची पहिली जाहिरात करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

नंदू नाटेकर यांनी वयाच्या २० व्या वर्षी १९५३ मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत बरीच मोठी कामगिरी केली होती. १९५४ मध्ये, त्यांनी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यानंतर ते या स्पर्धेत कधीही खेळले नाहीत. १९५१ ते १९६३ या काळात थॉमस चषक स्पर्धेत ते भारतीय संघाचा भाग होते आणि १६ पैकी १२ सामने जिंकण्यात यशस्वी झाले होते. यावरून एकेरी स्पर्धांमध्ये त्यांच्यां खेळाचा अंदाज बांधला जाऊ शकतो. दुहेरी प्रकारात त्यांनी १६ पैकी आठ सामने जिंकले आणि १९५९, १९६१ आणि १९६३ मध्ये ते संघाचे कर्णधारही होते

First Published on: July 28, 2021 10:49 AM
Exit mobile version