‘टुकडे-टुकडे गँग अस्तित्वात नाही’, गृहमंत्रालयाचा भाजपला घरचा आहेर!

‘टुकडे-टुकडे गँग अस्तित्वात नाही’, गृहमंत्रालयाचा भाजपला घरचा आहेर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह

देशाचं विभाजन करणाऱ्या ‘टुकडे टुकडे गँग’वरून भाजपनं देशभर रान पेटवलं होतं. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपकडून टुकडे-टुकडे गँगच्या नावाने देखील प्रचार केला. गेल्या महिन्याभरात दिल्लीत जामिया विद्यापीठ, जेएनयू, शाहीन बागमध्ये सुरू असलेलं आंदोलन या सगळ्या ठिकाणी टुकडे टुकडे गँगचाच हात असल्याचा दावा देखील अनेक भाजप नेत्यांनी जाहीर सभांमध्ये देखील केला. मात्र, आता त्याच भाजपच्या अमित शहांच्या गृहमंत्रालयाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनीच यासंदर्भात भाजपला धक्का बसणारं विधान केलं आहे. आणि तेही थेट लोकसभेमध्ये!

काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

काँग्रेसचे आमदार व्हिन्सेंट एच. पाला आणि जसबिरसिंग गिल यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. ‘टुकडे-टुकडे गँग असं काही अस्तित्वात आहे का? त्या गँगसंदर्भात विश्वासार्ह माहिती मिळाली आहे का? आणि या गँगचे नेते आणि सदस्यांची यादी गृहमंत्रालयाकडे आहे का?’ असे प्रश्न लोकसभेत उपस्थित करण्यात आले होते. त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लेखी उत्तर दिलं आहे.

‘असं काहीही अस्तित्वात नाही’

या उत्तरात, ‘टुकडे-टुकडे गँग या नावाच्या कोणत्याही संघटनेसंदर्भात कोणत्याही सरकारी संस्थेने कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही’, असं सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच साकेत गोखले नावाच्या एका व्यक्तीने यासंदर्भात माहिती अधिकारात उघड झालेली माहिती जाहीर केली होती. त्यामध्ये देखील गृहमंत्रालयाने अशी कोणतीही गँग अस्तित्वात नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे भाजपच्या ‘टुकडे-टुकडे गँग’च्या दाव्यातली हवाच निघून गेल्याचं बोललं जात आहे.


हेही वाचा – ‘टुकडे टुकडे गँग’बद्दल धक्कादायक बाब उघड!
First Published on: February 11, 2020 7:24 PM
Exit mobile version