‘चांद्रयान २’ मोहिमेचे परदेशी माध्यमांनी केले कौतुक

‘चांद्रयान २’ मोहिमेचे परदेशी माध्यमांनी केले कौतुक

विक्रमचे सॉफ्ट लँडिंग करण्यास अपयश आले असले तरी प्रमुख परदेशी माध्यमांनी इस्त्रोच्या चांद्रयान – २ मोहिमेचे कौतुक केले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान-२’ची मोहीम होती. विशेष म्हणजे, यापूर्वी याठिकाणी कोणत्याच देशाची चांद्रमोहीम झाली नव्हती. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान – २ या मोहिमेवर लागले होते. काही कारणास्तव मोहिम अयशस्वी ठरली असली तरी न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी आणि गार्डियन यांच्यांसह अनेक प्रसारमाध्यमांनी भारताच्या चांद्रयान मोहिमे विषयी कौतुगोद्गार काढले.

या मोहिमेतून तरुणांना प्रेरणा मिळेल – वॉशिंग्टन पोस्ट

चांद्रयान-२ मोहिमेचे कौतुक करताना अमेरिकन मॅगझिन वायरने हा प्रकल्प महत्त्वकांक्षी असल्याचे म्हटले आहे. तसेच विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर यशस्वीरीत्या उतरवण्यास अपयश आल्यामुळे भारताला धक्का बसला आहे. मात्र, या अपयशाला पराभव समजू नये असेही यात म्हटले आहे. न्यूयॉर्क टाइम्सनेदेखील चांद्रयान – २ मोहिमेची दखल घेतली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार चांद्रयान – २ चे ऑरबीटर अद्याप चंद्राभोवती आहे. त्यामुळे ही मोहीम अंशतः अपयशी झाली असे म्हणावे लागेल. चंद्रावर उतरणाऱ्या देशांच्या यादीत येण्यासाठी भारताला काही काळ प्रतिक्षा करावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. तर द गार्डियन या ब्रिटीश वृत्तपत्राने देखील आपल्या लेखात इस्त्रोच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. वॉशिंग्टन पोस्टनेसुद्धा भारताच्या चांद्रयान – २ मोहिमेची दखल घेतली आहे. चांद्रयान २ जरी अपयशी ठरले असले तरी भारतीयांना या मोहिमेचे विशेष कौतुक वाटत आहे. या मोहिमेमुळे भारतीयांची राष्ट्राभिमानाची भावना उंचावली आहे. सोशल मीडियावर भारतीय संशोधकांना मोठा पाठिंबा मिळत आहे. या अपयशातून संशोधक भरारी घेतील, असा विश्वास व्यक्त करुन या मोहिमेमुळे तरुणांना प्रेरणा मिळेल, असेही वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

हेही वाचा – पाकिस्तानच्या हवाई हद्दीत राष्ट्रपतींच्या विमानाला परवानगी नाही

First Published on: September 7, 2019 8:15 PM
Exit mobile version