नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून तणाव! आसाममध्ये रेल्वे स्टेशनच पेटवलं!

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून तणाव! आसाममध्ये रेल्वे स्टेशनच पेटवलं!

संसदेमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरातून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी त्याविषयी आनंद व्यक्त केला असतानाच बऱ्याच जणांनी त्यावर टीका देखील केली आहे. पूर्वेकडच्या राज्यांमध्ये या विधेयकाचा तीव्र विरोध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आसाममधील अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. काही भागांमध्ये विधेयकाविरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागल्याचं पाहायला मिळालं. याचदरम्यान, विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास आसाममधल्या दिब्रुगडमध्ये आंदोलकांनी रेल्वे स्टेशनलाच आग लावून दिल्यामुळे वातावरण अधिकच बिघडलं. त्यामुळे आसाममध्ये जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या गुवाहाटीपर्यंतच चालवण्यात येत आहेत. शिवाय, आसाममधील रेल्वेसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

आसामचे मुख्यमंत्री सर्वनंदा सोनोवाल यांचं गाव असलेल्या दिब्रुगढमधल्या छबुआ रेल्वे स्टेशनला आंदोलकांनी बुधवारी रात्री आग लावली. वेळीच ही बाब लक्षात आल्यामुळे त्या आगीवर तातडीने नियंत्रण आणणं शक्य झालं. त्यासोबतच, तिनसुखिया जिल्ह्यातील पनीटोला रेल्वे स्टेशनला देखील आंदोलकांनी आग लावल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आरपीएसएफ अर्थात रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्सच्या १२ तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या आहेत.

बहुप्रतिक्षित असे नागरिकत्व सुधारणा विधेयक अर्थात Citizenship Amendment Bill 2019 (CAB) आधी लोकसभेमध्ये आणि नंतर राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे आता पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि पश्चिम बंगालमधील अल्पसंख्य नागरिकांना भारतात आश्रय घ्यायचा असल्यास त्यांना भारताचं नागरिकत्व देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, हे विधेयक धार्मिक आधारावर दुफळी निर्माण करू शकते, या आधारावर विरोधकांनी आणि देशभरातील काही सामाजिक संघटनांनी याला विरोध केला आहे. चीन, म्यानमारमधून मोठ्या संख्येनं स्थलांतर करून पूर्वेकडच्या राज्यांमध्ये येणाऱ्या अशा अश्रितांना स्थानिकांचा तीव्र विरोध होत आहे.

First Published on: December 12, 2019 6:49 PM
Exit mobile version