राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाजवला ड्रम

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाजवला ड्रम

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (ता. 27 मार्च) राष्ट्रपतींचे आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदिवासी ढोल वाजवला. तसेच ममता बॅनर्जी यांनी यावेळी आदिवासी नृत्य सादरीकरणातही भाग घेतला. तर राष्ट्रपतीं मुर्मू यांनी सुद्धा हसतमुखाने कार्यक्रमाचा आनंद घेतला. मात्र, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.

याबद्दल दिल्लीत असलेले शुभेंदू अधिकारी यांनी ट्विट करत म्हंटले की, “जे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात मतदान करण्यासाठी रांगेत उभे होते ते स्टेजवर येतील आणि सत्कार समारंभात प्रसिद्धी मिळवतील! तर जे राष्ट्रपतींच्या बाजूने आहेत त्यांना बंगाल सरकारने आमंत्रित देखील केले नाही.” तथापि, शुभेंदू अधिकारी, प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आल्याचा दावा टीएमसीकडून करण्यात आला आहे.

याबाबत तृणमूल काँग्रेस पक्षाकडून सांगिण्यात आले की, ‘नेताजी इनडोअर स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. पण त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही.’

दरम्यान, राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचा पश्चिम बंगालचा हा पहिलाच दौरा आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कार्यक्रम स्थळी पिवळा पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपतींचे स्वागत केले. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रपतींना शाल देखील दिली.

राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपतींच्या या दौऱ्याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बेलूर मठाला भेट देतील. मिळालेल्या माहितीनुसार, मुर्मू युको बँकेला 80 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोलकाता येथे एका कार्यक्रमातही उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे कोलकाता ते वीरभूमीपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.


हेही वाचा – भारतातील राजदूतासह इस्रायल दूतावासातील अधिकारी संपावर, वाचा नेमके प्रकरण काय?

First Published on: March 27, 2023 9:12 PM
Exit mobile version