उत्तर प्रदेशात थंडीचे २५ बळी; जनजीवन मंदावले

उत्तर प्रदेशात थंडीचे २५ बळी; जनजीवन मंदावले

नवी दिल्लीः जानेवारी महिन्यात वाढलेल्या थंडीने उत्तर प्रदेशात २५ जणांचा बळी घेतला आहे. पक्षघात व हदयविकाराच्या झटक्याने हे बळी गेले आहेत. येत्या २४ तासांत थंडीचा तडाखा अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

वाढत्या थंडीमुळे उत्तर भारतातील जनजीवन मंदावले आहे. दाट धुके पडल्यामुळे रस्ते, रेल्वे व हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीत ३० विमानांचे उड्डाण उशिराने झाले.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढला. हळूहळू थंडीने जोर धरला. पारा घसरल्याने सर्वत्र धुके पसरले. उत्तर भारताला थंडीच सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे तेथील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन करते. मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना थंडीचा अधिक त्रास होतो. अशा रुग्णांनी योग्य आहार घ्यावा व नियमित व्यायाम करावा, असा सल्ला डॉक्टर देतात.

उत्तर भारताला थंडीचा तडाखा बसत असल्याने तेथील नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जाते. कार्डिऑलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये हृदयविकारग्रस्त ७२३ रुग्णांची गुरुवारी तपासणी करण्यात आली. तसेच थंडीमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती समोर आली. त्यात पक्षघात व ह्रदयविकाराच्या झटक्याने २५ जणांचा मृत्यू झाला तर १७ जणांचे वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच निधन झाले, अशी माहिती समोर आली.

थंडीच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हृदय तसेच मेंदू यांच्या क्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. कडाक्याच्या थंडीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. त्यामुळे रक्तदाब वाढून लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यात काही जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असे ह्रदयविकार तज्ज्ञांनी सांगितले.

नॉयडा, गाझियाबाद, अयोध्या, कानपूर, लखनऊ, बरेली, मुरादाबाद येथे पारा घसरला आहेत. हरयाणा, राजस्थान, पंजाबमध्ये थंडी वाढली आहे. तर काश्मीरमध्ये किमान तापमान किंचित वाढले आहे. दोन आठवड्यांपूर्वी श्रीनगरमध्ये जलस्त्रोतील पाणी गोठवणारी थंडी होती. येथील तापमान -४ अंश सेलसिअस झाले होते. पाण्याचे स्त्रोत गोठले होते. पाणी टंचाई झाली होती.

 

First Published on: January 7, 2023 10:00 AM
Exit mobile version