‘काँग्रेसने स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान करत चुकीचा इतिहास देशापुढे मांडला’

‘काँग्रेसने स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान करत चुकीचा इतिहास देशापुढे मांडला’

‘जालियनवाला बाग हत्याकांड राष्ट्रीय स्मारक (दुरुस्ती) विधेयका’ला समर्थन देताना शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले. आजवर स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान करून चुकीचा इतिहास देशापुढे मांडणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची, ‘जालियनवाला बाग हत्याकांड राष्ट्रीय स्मारका’च्या विश्वस्तपदावर राहण्याची पात्रता नसल्याची खरमरीत टीका खासदार शेवाळे यांनी लोकसभेत केली.

हेही वाचा – भाजप-शिवसेना सरकार ओबीसींच्या हक्कांवर गदा आणत आहे – विजय वडेट्टीवार

केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या वतीने लोकसभेत सादर करण्यात आलेल्या ‘जालियनवाला बाग हत्याकांड राष्ट्रीय स्मारक (दुरुस्ती) विधेयकाचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी समर्थन केले. काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा जालियनवाला बाग स्मारकाचा विश्वस्त असेल, या मूळ विधेयकात दुरुस्ती करणारे हे विधेयक योग्य वेळी सभागृहात सादर केल्याबाबत खासदार शेवाळे यांनी आभार मानले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करावा

खासदार शेवाळे पुढे म्हणाले की, “या घडीला काँग्रेस अध्यक्ष पद रिक्त आहे. तसेच या राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्तपदी राहण्याची काँग्रेसच्या अध्यक्षांची पात्रता नाही. कारण काँग्रेसने नेहमीच स्वतंत्र्यसैनिकांचा अवमान करून चुकीचा इतिहास देशापुढे मांडला आहे, अशी खरमरीत टिका करत राहुल शेवाळे पुढे म्हणाले की, ”देशासाठी आपले आयुष्य वेचलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांपुढे शरणागती पत्करली. आपल्या सुटकेसाठी त्यांनी इंग्रजांची माफी मागितली, असा अपप्रचार काँग्रेसने नेहमी केला. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांवर पुण्यामध्ये गुन्हाही नोंदवला गेला आहे. दिल्लीतही काँग्रेसने असाच अपप्रचार केला. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांची या राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याची पात्रता नाही” अशा शब्दांत खासदार शेवाळे काँग्रेसवर बरसले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, या मागणीचा पुनरुच्चारही खासदार शेवाळे यांनी लोकसभेत केला.

First Published on: August 2, 2019 9:34 PM
Exit mobile version