मनोहर पर्रीकरांची प्रकृती खालावली; काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा

मनोहर पर्रीकरांची प्रकृती खालावली; काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा

Congress

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येताच गोव्यात काँग्रेसने राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे तातडीने सरकार स्थापनेचा दावा सादर केला आहे. सध्या गोव्याच्या विधानसभेत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष आहे. आज, शनिवारी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर काही तासातच काँग्रेसने राज्यपालांकडे भाजप अल्पसंख्याक असल्याने सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

दोन्ही पक्षाच संख्याबळ 

गोवा विधानसभेची सदस्य संख्या ४० असून सध्या तीन जागा रिक्त आहेत. ३७ पैकी काँग्रेसचे १४ सदस्य आहेत. भाजपचे १३, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ३, गोवा फॉरवर्डचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर तीन अपक्ष आमदार आहेत. काँग्रेस वगळता इतर सर्व सत्ताधारी गटात आहेत. यापूर्वी काँग्रेस आणि भाजपचे बलाबल १४-१४ असे होते. म्हापशाचे आमदार अॅड. फ्रांसिस डिसोझा यांच्या मृत्यूनंतर भाजपची सदस्यसंख्या १३ झाली. त्यातच आज मुख्ममंत्री पर्रीकर यांची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती प्रसारित होऊ लागली आहे. त्यामुळे विधानसभा विसर्जनाचा विचार होऊ नये म्हणून आता पाचव्यांदा काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी तसे पत्र राजभवनाच्या कार्यालयाला सादर केले आहे.

पाचव्यांदा केला सत्तास्थापनेचा दावा 

विधानसभेची निवडणूक २०१७ मध्ये झाली. तेव्हाही काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यांच्या एका आमदाराने आमदारीकीची शपथ घेतल्यानंतर राजीनामा दिला. त्यातच काँग्रेस विधीमंडळ गटाचा नेता रात्रभर ठरत नव्हता. याचा फायदा घेत त्यावेळी केवळ १३ सदस्य असलेल्या भाजपने इतरांना सोबत घेत सरकार स्थापन केले होते. तेव्हापासून काँग्रेसकडून आपल्याला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

First Published on: March 16, 2019 8:18 PM
Exit mobile version