Congress : पुन्हा हे करण्याची हिंमत होणार नाही, ही माझी गॅरंटी; राहुल गांधींचा भाजपाला इशारा

Congress : पुन्हा हे करण्याची हिंमत होणार नाही, ही माझी गॅरंटी; राहुल गांधींचा भाजपाला इशारा

नवी दिल्ली : कर, दंड आणि व्याजापोटी प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला सुमारे 1800 कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे. ही नोटीस 2017-18 ते 2020-21 या वर्षासाठी पाठवण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसकडून तीव्र प्रतक्रिया येत आहेत. खुद्द खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी या सरकारी यंत्रणांसह मोदी सरकारला इशारा देताना ते दिसत आहेत.

हेही वाचा – NCP : यंदाच्या लोकसभेतही ही वस्तूस्थिती मान्य करावी लागेल, राष्ट्रवादीचा अमोल कोल्हेंना टोला

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस पक्षाला मोठा दणका दिला होता. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने ही कारवाई करत नोटीस पाठवली आहे. काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून 2017-18 ते 2020-21 या कालावधीत करवसूल करण्यासाठी पाठविलेल्या नोटिशीला विरोध केला होता. काँग्रेसच्या खात्यांमध्ये अनेक बेहिशेबी व्यवहार झाल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पुनर्मूल्यांकनाची कार्यवाही सुरू करण्यासाठी सबळ पुरावे आहेत. त्याआधारे ही कारवाई सुरू करण्यात आली. प्राप्तिकर विभागाला सापडलेल्या पुराव्यात असे दिसते की, पैशाचे व्यवहार रोखीच्या माध्यमातून झाले. यामध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांचाही सहभाग होता. तसेच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि एका कंपनीसोबत काँग्रेसचे व्यवहार झाल्याचेही समोर आले असून हे नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. काँग्रेसच्या बँक खात्यांमधून प्राप्तिकर विभागाने यापूर्वीच 135 कोटी रुपये वसूल केले आहेत.

हेही वाचा – NIlesh Lanke : अजित पवारांना मोठा धक्का; आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके शरद पवार पक्षात

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. केवळ विरोधकांवर ही अन्यायकारक कारवाई करण्यासाठी प्राप्तिकर विभागावर कोण दबाव आणत आहे? मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसला त्रास देण्यासाठी प्राप्तिकर विभागाचा वापर शस्त्र म्हणून का केला जात आहे? असे सवाल करून खर्गे म्हणाले की, लोकशाही नष्ट करण्यासाठी आणि राज्यघटना कमकुवत करण्यासाठी ते प्राप्तिकर विभाग, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करत आहेत.

तर, खासदार राहुल गांधी यांनी 15 मार्च 2024चा व्हिडीओ शेअर केला आहे. सरकार बदलल्यावर लोकशाही नष्ट करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल. अशी कारवाई केली जाईल की पुन्हा हे सर्व करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, ही माझी गॅरंटी आहे, असे ते म्हणताना दिसत आहेत.

हेही वाचा – Rohit Pawar : हा खऱ्या मागासवर्गावरील घोर अन्याय, रश्मी बर्वेंसंदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया

First Published on: March 29, 2024 8:59 PM
Exit mobile version