दिल्ली हिंसाचार: १८ जणांवर गुन्हे दाखल, मृतांची संख्या २५ वर

दिल्ली हिंसाचार: १८ जणांवर गुन्हे दाखल, मृतांची संख्या २५ वर

दिल्ली हिंसाचाराप्रकरणी १०६ जणांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत २५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर दोनशेहून अधिकजण जखमी झाले आहेत. या हिंसाचाराप्रकरणी ८ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासह १०६ जणांना अटक करण्यात आली आहे. गुरु तेग बहादूर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुनीलकुमार यांनी आज तीन गंभीर जखमींचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

दरम्यान, दिल्लीच्या संवेदनशील भागात आता ड्रोनच्या सहाय्याने लक्ष ठेवले जात आहे. हिंसाचाराच्यावेळी घरांच्या छतावरुन दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांकडून छतांची पाहणी केली जात आहे. ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांच्याविरोधातील पुरावे मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे दिल्लीचे पोलीस प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी सांगितले.

दिल्लीतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात

सध्या दिल्लीतील परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे कोणालाही घाबरुन जाण्याची गरज नाही. ज्या लोकांना कोणतीही तक्रार करायची असेल तर ते ११२ या हेल्पलाईनवर संपर्क करु शकतात. नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही रंधवा यांनी सांगितले.


हेही वाचा – दिल्ली हिंसाचार: गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या; नाल्यात आढळला मृतदेह


डोवालांनी केली घटनास्थळाची पाहणी

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीतील मौजपूर भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. उत्तर-पूर्व दिल्लीचा भाग असणाऱ्या मौजपूरमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला आहे. दिल्लीच्या सुरक्षेची सूत्रे आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हाती देण्यात आली आहेत. दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे याबद्दलची माहिती डोवाल पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाला देणार आहेत.

अजित डोवाल यांनी स्वत: तिथे जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांना विश्वास दिला. ‘मनात प्रेमाची भावना ठेवा, आपला देश एक आहे,’ असे नागरीकांशी संवाद साधताना ते म्हणाले. “परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. लोक समाधानी आहेत. सुरक्षा यंत्रणांवर मला पूर्ण विश्वास आहे. पोलीस त्यांचे काम करत आहेत,” असे डोवाल म्हणाले.

 

First Published on: February 26, 2020 11:14 PM
Exit mobile version