‘तो’ निर्णय घेऊन मस्क चुकले, कर्मचाऱ्यांना पुन्हा केला फोन; वाचा नेमके काय घडलं?

‘तो’ निर्णय घेऊन मस्क चुकले, कर्मचाऱ्यांना पुन्हा केला फोन; वाचा नेमके काय घडलं?

जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीचे सीईओ आणि ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेतल्यापासून अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते आहे. नुकताच एलॉन मस्क यांनी ट्विटरमधील 50 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले. मात्र, या कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर ट्विटरला पुन्हा या कर्मचाऱ्यांची गरज असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. (Elon Musk Fired Employees To Come Back Who Were Laid Off By Mistake)

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरने घरचा रस्ता दाखवलेल्या डझनभर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना कामावर परत येण्यास सांगितले आहे. काही कर्मचाऱ्यांचा अनुभव आणि काम कंपनीच्या हितासाठी आवश्यक असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना परत कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले.

ट्विटरने गेल्या आठवड्यात जवळपास साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. या कपातीमध्ये भारतातील 180 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांची कपात ट्विटरच्या सर्वच विभागांमध्ये करण्यात आली आहे.

दरम्यान, एलॉन मस्क यांनी केलेल्या बदलांनंतर कामाची डेडलाईन पुर्ण करण्यासाठी अधिक कामे करावी लागणार असल्याचे ट्विटरच्या मॅनेजरने कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानुसार, मस्कची डेडलाइन पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 12 तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यांना आठवड्यातून 7 दिवस काम करण्यास सांगितले आहे.

कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी जाहीर माफी मागितली आहे. ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी शनिवारी इलॉन मस्कच्या कारवाईदरम्यान ट्विटरच्या माध्यमातून माफी मागितली आहे. “ट्विटरवर काम केलेले अगोदरचे आणि आताचे कर्मचारी अत्यंत हुशार आहेत. कितीही कठीण प्रसंग आले तरी ते नेहमीच मार्ग शोधतील. मला माहित आहे बरेच कर्मचारी माझ्यावर नाराज आहेत. मला राग आला आहे. मला मान्य आहे की माझ्यामुळे सर्वांवर ही परिस्थिती ओढावली आहे. मी ही कंपनी खूप लवकर मोठी केली आहे, त्यासाठी मी सर्वाची माफी मागतो”, अशा शब्दांत जॅक डोर्सी यांनी माफी मागितली.


हेही वाचा –  एलॉन मस्क येताच ट्विटरच्या कर्मचाऱ्यांचा ताप वाढला; दरदिवशी करताहेत 12 तास काम

First Published on: November 7, 2022 10:15 AM
Exit mobile version